मोठी बातमी: पुण्याच्या ग्रामीण भागात लसीकरणाला वेग पुन्हा वाढला
Covid vaccine | गेल्या आठ दिवसात तब्बल 2 लाख 28 हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या एकूण लसीकरणात 15 लाख 21 हजार 906 जणांनी पहिला, तर 4 लाख 86 हजार 283 जणांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
पुणे: केंद्राकडून राज्याला कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध होत असल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग पुन्हा वाढला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील 20 लाख 8 हजार 189 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आठ दिवसांपूर्वी हीच संख्या एकूण 17 लाख 794 इतकी होती.
गेल्या आठ दिवसात तब्बल 2 लाख 28 हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या एकूण लसीकरणात 15 लाख 21 हजार 906 जणांनी पहिला, तर 4 लाख 86 हजार 283 जणांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोविशिल्ड’ची टंचाई
पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोविशिल्ड’ लसीची टंचाई असल्याचा प्रकार समोर आला आहे. तर आज फक्त 4 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना आज फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. 4 केंद्रांवर 100 च्या क्षमतेने लस देण्यात येणार आहे. ‘कोविशिल्ड’ लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आज कोविशिल्ड लस मिळणार नाही.
गेल्या 24 तासांत राज्यात 6,017 नव्या रुग्णांची नोंद
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असून, रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारनं केलेल्या प्रयत्नांनाही यश येताना दिसतंय. राज्यात सोमवारी 6,017 रुग्ण सापडलेत. राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय.
13,051 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत
राज्यात सोमवारी 13,051 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 59,93,401 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.35 % एवढे झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,56,48,898 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,20,207 (13.63 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 5,61,796 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 4,052 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली मुंबई कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेय. त्याशिवाय मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
इतर बातम्या:
जुन्नरमधील पर्यटनस्थळांवर मज्जाव, कलम 144 लागू करुनही पर्यटकांची गर्दी कायम
जगावेगळी चोरी! तलावातून चोरले तब्बल 5 लाखांचे मासे, चौघांविरोधात तक्रार, पोलीसही चक्रावले
पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा 31 जुलैपर्यंत बंद राहणार, महापालिका आयुक्तांचे आदेश