दौंडमध्ये नवी राजकीय समीकरणं; राहुल कुल यांच्याविरोधात बडा नेता रिंगणात
Daund Vidhansabha Election 2024 : राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत नवी राजकीय समिकरणं पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातही अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघातील नेमकी राजकीय स्थिती काय आहे? वाचा सविस्तर...
राज्यात विधानसभेची निवडणूक होतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पुणे जिल्ह्यात नवी समीकरणं पाहायला मिळतायेत. पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी दिली जाणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच अजित पवार गटातील बडा नेत्याने शरद पवारांची भेट घेतली आहे. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांची शरद पवारांची भेट घेतली आहे. रमेश थोरात शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
दौंडमधील राजकीय समीकरण
दौंड हा ग्रामीण मतदारसंघ आहे. बहुतांशी भागातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. त्यामुळे या भागाती प्रश्न वेगळे आहेत. या मदारसंघात कुल कुटुंबियांचा जनाधार मोठा आहे. राहुल कुल यांचे वडील सुभाष कुल हे याआधी या मतदारसंघात आमदार होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रंजना कुल आमदार झाल्या. त्यानंतर आता सुभाष कुल यांचे पुत्र राहुल कुल दौंडचे आमदार आहेत. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर राहुल कुल भाजपमध्ये आहेत.
दुसरीकडे रमेश थोरात हे पवारांचे विश्वासू मानले जातात. पण अजित पवार भाजपसोबत गेले. तेव्हा रमेश थोरातही त्यांच्या सोबत गेले. मात्र आता ते शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहेत. जरी शरद पवार गटातून उमेदवारी दिली गेली नाही, तरी अपक्ष लढण्याची तयारी रमेश थोरात यांनी दर्शवली आहे. राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यात कायमच राजकीय संघर्ष राहिलेला आहे. यंदाच्या निवडणुकीतही हे दोन नेते एकमेकांच्या विरोधात लढण्याची दाट शक्यता आहे.
रमेश थोरात यांची प्रतिक्रिया
आतापर्यंत तुतारीचा निरोप आलेला नाही. आला तर मतदारांशी चर्चा करून पुढला निर्णय घेणार आहे. पहिली तुतारी मिळेल तर पहिली तुतारी घ्यायची. जर तुतारी नाही मिळाली. तर अपक्ष लढावे लागेल. असे लोकांनीच मला आदेश दिले आहेत, असं रमेश थोरात म्हणाले. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी माझ्याशी संपर्क केला होता. परंतु लोक जे ठरवतील. तो माझा निर्णय असेल मी असं त्यांना कळवलं होतं, असंही रमेश थोरात यांनी म्हटलं आहे.
थोरातांची लढण्याची तयारी
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी बैठक झालेली आहे. मी त्यांना कळवले आहे की माझी लढण्याची तयारी आहे. आज संध्याकाळपर्यंत याद्या जाहीर होतील. त्यांच्या म्हणण्यात आले आहे की, इलेक्टिव्ह मेरिटवर म्हणजेच निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवाराला संधी दिली जाईल. त्यामुळे आज येणाऱ्या यादीत नाव असणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे, असं रमेश थोरातांनी म्हटलं आहे.