नसबंदी करा, ही काय मागणी झाली व्हय?, नसंबंदीने सरकार पडलं; अजित पवार असं का म्हणाले?
मागे एक वर्ष आपण सत्तेत नव्हतो तर अनेक कामं रखडली. माझ्यावर 70 हजार कोटींचा आरोप करण्यात आला. 1960 पासून जलसंपदा विभागात 45 हजार कोटींची खर्च झाला आणि माझ्यावर काय आरोप झाला, की मी 70 हजार कोटींचा घोटाळा केला. धादांत खोटा आरोप होता, हे पुढं सिद्ध झालं, असा दावा करतानाच सत्तेशिवाय कोणताही विकास होत नाही, असंही अजित पवार म्हणाले.
सुनील थिगळे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, जुन्नर | 25 जानेवारी 2024 : जुन्नर येथील शेतकरी मेळाव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. अजितदादांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट भाष्य केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हे मी ठामपणे सांगतो. मागे पृथ्वीराज चव्हाण आणि अलिकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. पण ते टिकलं नाही. आरक्षण हे कायमस्वरूपी टिकायला हवं, तशाप्रकारे काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. मी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, याच मताचा मी आहे. उगाच माझ्याबद्दल काहीजण अपप्रचार करतात. माझ्या काही क्लिप व्हायरल केल्या जातात. दादा काय येडा आहे की खुळा आहे? मला काय कळत नाही का? मी आरक्षण मिळावं यासाठीच काम करणार आहे, अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच बिबट्यांच्या नसबंदीवरूनही त्यांनी टोलेबाजी केली.
अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारमध्ये सर्वजण बसून मार्ग काढू. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पाहू. सर्वांना एकत्र घेवून सरकार चालवावे लागते, असं अजित पवार यांनी सांगितलं. आज अंगणावाडी सेविका नागपूर येथील पवार यांच्या सरकारी निवासस्थानी मोर्चा काढणार होत्या, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
कारण पुढे मोदी आहेत
पश्चिम बंगालच्या नेत्या ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नरेंद्र मोदींना पर्याय आहे का? त्यांच्यासमोर कोणी लढायला तयार आहे का? इंडिया आघाडी केली गेली, पण ममता बॅनर्जी आताच म्हणल्या, मी माझी स्वतंत्र लढणार. का? त्यांनी असा निर्णय घेतला? कारण पुढं मोदी आहेत, असं अजितदादा म्हणाले.
सहा महिन्यात कुठं गेलं परकीय व्यक्तीचं धोरण
1991 ला मी खासदार झालो. कालांतराने मला राजीनामा द्यावा लागला. माझ्या जागी शरद पवार खासदार झाले, केंद्रात मंत्री झाले. मला राज्यात मंत्री करण्यात आलं. पुढं 1995 ला मी फक्त आमदार होतो, आघाडीचे सरकार त्यावेळी पडलं. 1999 साली परकीय व्यक्तीकडे आपल्या पक्षाचं नेतृत्व नसावं असं मत वरिष्ठांनी घेतलं. अगदी सहा महिन्यात आम्ही पुन्हा आमदार झालो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा परकीय नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेससोबत सत्तेत गेलो. मग सहा महिन्यात कुठं गेलं, परकीय व्यक्तीचं धोरण?, असा सवाल त्यांनी शरद पवार यांना केला.
वरिष्ठांनी निर्णय घेतला की चालतो अन्…
आजवर शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि भाजपचेही मुख्यमंत्री झाले. पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची संधी का येत नाही? आरआर आबा, छगन भुजबळ असे अनेक मातब्बर नेते आपल्याकडे होते. त्यापैकी कोणाला ही मुख्यमंत्री करता आलं असतं, मी काय माझा हट्ट धरला नव्हता. आता अलीकडेच शिवसेनेसोबत सत्तेत गेलो, ते चालतं. मग भाजप सोबत सत्तेत गेलो तर काय बिघडलं? वरिष्ठांनी निर्णय घेतला की चालतो, कनिष्ठांनी घेतला की का नाही चालत?, असा सवालही त्यांनी केला.
ही काय मागणी झाली व्हय
जुन्नरमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्या बिबट्यांचा बंदोबस्त लावा अशी मागणी होत आहे. कारण बिबट्या आता लोकांवरही हल्ले ही करू लागलाय. आता असं घडतंय तर तुम्ही रात्री-अपरात्री बाहेर कशाला पडता? घरातच झोपत जा ना? असा सल्ला अजित पवारांनी दिला. मात्र शेतकऱ्यांना रात्री शेतात पाणी सोडायला जावंच लागतं, हे लक्षात येताच. मी गंमतीत बोललो, कारण दिवसाही बिबटे आता आढळू लागले आहेत. शिवाय या परिसरात दिवसा लोडशेडिंग होते, अशावेळी काहींना रात्री पाणी सोडण्यासाठी जावे लागते. ते महत्वाचं काम आहेच. पण मागण्या करताना वास्तवदर्शी करा. आता एक निवेदन आलंय. बिबटे पकडा आणि त्यांना असं इंजेक्शन द्या की ते नपूसंक व्हायला पाहिजेत, त्यांची नसबंदी करावी. आता ही काय मागणी झाली व्हय? पूर्वी एका राज्यात नसबंदी केली अन् सरकार पडलं, हे आठवतं का तुम्हाला?, असा टोला त्यांनी लगावला.