पुणे : मावळमध्ये वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकाचा पवना धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. शुभम दुधाळ असं या बुडालेल्या तरुण पर्यटकाचं नाव आहे. तो पवना धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. तब्ब्ल 2 तासांनी बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक तरुणांना यश आलं (Death of tourist in Maval Pune by drowning in Pavana Dam amid restriction).
VIDEO: पुण्यात बंदी असतानाही पर्यटन करणं जीवाशी बेतलं, मावळमध्ये पवना धरणात तरुणाचा बुडून मृत्यू#Pune #Tourism #Maval #PavanaDam pic.twitter.com/qnF3NTk7pN
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) July 11, 2021
शुभम आणि त्याचे 6 मित्र मावळ परिसरात वर्षाविहारासाठी आले होते. दुपारच्या सुमारास ते पवना धरण परिसरातील वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले. दर्शन झाल्यानंतर ते पवना धरणातील बॅकवॉटरमध्ये पोहण्यासाठी उतरले. त्यावेळी शुभम दुधाळ याला पाण्याचा अंदाज न आल्याने दम लागून तो पाण्यात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात पर्यटन बंदी असताना सुद्धा पर्यटक मावळ तालुक्यात येत आहेत. लोणावळा, खंडाळा या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक बंदी असतानाही नियमांची पायमल्ली करत पर्यटनस्थळावर दाखल होत आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाला पर्यटनस्थळी कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत. तसेच नियम मोडणाऱ्या पर्टयकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
अजित पवार म्हणाले होते, “जिल्ह्यातील पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी केली जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कोरोनाबाबच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी. कोणत्याही परिस्थितीत नियम पाळलेच पाहिजेत. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे हे सर्वांच्याच हिताचेच आहे.”
पुण्यात अजूनही कोरोनाचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. येत्या आठवड्यातही पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करणारे आणि शनिवार-रविवारी पर्यटनस्थळी गर्दी करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश अजित पवारांनी दिलेत. या आदेशानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केलीय. या कारवाईअंतर्गत पुणे पोलिसांनी 400 हून अधिक लोकांकडून दंड ठोठावला आहे.
Death of tourist in Maval Pune by drowning in Pavana Dam amid restriction