उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडणार हे शरद पवार यांना कुणी सांगितलं?; Deepak Kesarkar यांचा मोठा दावा काय?

| Updated on: Oct 16, 2023 | 1:22 PM

एकही शाळा बंद करण्याची ऑर्डर नाही. समूह शाळेत जायचं असेल तर शहरात सोय होते. ग्रामीण भागात का सोय होत नाही? त्यामुळे शाळा अजिबात बंद केल्या जाणार नाहीत, असं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडणार हे शरद पवार यांना कुणी सांगितलं?; Deepak Kesarkar यांचा मोठा दावा काय?
deepak kesarkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 16 ऑक्टोबर 2023 : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. त्यानंतर ते महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. तसेच ही बातमी फोडल्या गेल्याचा दावाही त्यांनी केला असून बातमी फोडणाऱ्या नेत्याचं नावच केसरकर यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. त्यासाठी मी मध्यस्थ होतो. उद्धव ठाकरे यांनी आघाडी तोडण्यासाठी आणि महायुतीत येण्यासाठी भाजपकडून 15 दिवसांचा अवधी मागून घेतला होता. पण यात कोण खलनायक होतं हे आम्हाला माहीत नव्हतं. सुनील तटकरे यांनी याबाबतचा खुलासा केला. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना न विचारता ही बातमी शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवली असं तटकरे म्हणाले. याचा अर्थ महायुती न होण्यात राऊत यांचा मोठा रोल आहे हे स्पष्ट होतं, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे.

दादाच बोलू शकतील

मीरा बोरवणकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. त्यावर केसरकर यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. मीरा बोरवणकर यांना सगळी माहिती असू शकते. त्याचबरोबर महसूल विभागालाही अधिक माहिती असू शकते. याबाबत अजितदादाच जास्त खुलासा देऊ शकतील. त्या परिस्थितीत, त्या ठिकाणी काही घडलं होत का? हे सांगता येणार नाही. महसूल खातं त्यांचा अधिकार वापरू शकतं. त्या चांगल्या अधिकारी आहेत. त्यांचा दादाचा वाद असेल तर दादा बोलतील, असंही केसरकर म्हणाले.

जरांगे पाटील यांनीच सांगावं

मनोज जरांगे पाटील यांच्या डेडलाईनवरही त्यांनी भाष्य केलं. आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. आता आरक्षण कसं मिळावं हे जरांगे पाटील यांनी सांगावं. ओबीसींमध्ये आणखी एक जागा वाढली तर जागा कमी होतील. अनेक जिल्ह्यात ओपनच्या जागा शिल्लक नव्हत्या. त्या भरून घेतल्या आहेत. सरकारची आरक्षण देण्याची भूमिका आहे. आता सर्वांनी एकत्र बसावं. आरक्षण टिकण्यासाठी काय करता येईल ते सांगावं, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी बोलूच नये

उद्धव ठाकरे यांना पाकिस्तानवर बोलायचा अधिकार नाही. त्यांना हिंदुत्वावर बोलायचा अधिकार आहे का? त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे. राहुल गांधींना घाबरतातच पण स्टॅलिनच्या मुलालाही घाबरले आहेत. त्यामुळे त्यांना बोलायच अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका करणं सोडून द्यावं. मोदींना जग मानतं. कॅनडाला धडा शिकवण्याची हिंमत त्यांनी दाखवली. मेक इन इंडियामुळे आपल्याकडे एवढी शस्त्रास्त्राची निर्मिती झाली की कुणी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, असंही ते म्हणाले.