मोठी बातमी ! अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, कधी?; दीपक केसरकर यांनी स्पष्टच सांगितलं
नव्या संसद भवनाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. त्यावरही केसरकर यांनी टीका केली. विरोधकांनी आधी साधा प्रोटोकॉल लक्षात घ्यायला हवा. एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचे आणि बोलायचे हे विरोधक करत आहेत, असं ते म्हणाले.
पुणे : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल दिल्यानंतर तर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. मात्र, या विस्तारावर पहिल्यांदाच राज्य सरकारमधून अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार 100 टक्के होणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितल्याने आता विस्तारात कुणा कुणाला संधी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार 100 टक्के होणार आहे. मंत्रीपद वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील, असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी मीडियाशी संवाद साधताना केलं आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याचं दिसून येत आहे.
आमचं सूत्र ठरलंय
यावेळी केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचं सूत्रंही सांगितलं. किती जागा लढवायच्या, किती मागायच्या हा सगळा विषय वरिष्ठांचा आहे. एखाद्या निवडणुकीचे तयारी करतो तेव्हा राष्ट्रीय नेते एकत्र येतात. लोकसभा निवडणुकीची तयारी सगळ्यांनी सुरू केली आहे. 22 जागा मागितल्या बाबत प्रवक्ता म्हणून मी एकदाही बोललो नाही, असं सांगतानाच भाजप आणि आमचं जागा वाटपाचं सूत्र पूर्वीपासून ठरलेलं आहे. लोकसभेसाठी भाजप नेहमीच जास्त जागा घेत आलेला आहे. कारण ते केंद्रात असतात. शिवसेना राज्यात काम करते. पण आमच्या वाटेला ज्या जागा नेहमी येतात त्याबद्दल आम्ही तयारी केली तर चुकीचे काय आहे? असा सवाल त्यांनी केला.
रोहित पवारांना समजदार समजत होतो
यावेळी त्यांनी रोहित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांना टोले लगावले. कुठे जाऊन काय बोलायचे हे रोहित पवार यांनी शिकलं पाहिजे. उद्या ते मंत्री झाले तर ते असे बोलतील का? असा सवाल त्यांनी केला. तरुण मंडळींमध्ये रोहित पवार यांना मी समजदार समजत होतो. पण त्यांनी आधी एकदा माझ्याशी बोलायला हवं होतं. प्रकाश आंबेडकर यांना विचारा त्यांच्या देखील मिल्स आहेत. कमी दर्जाचा कपडा सध्या विद्यार्थ्यांना मिळत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.