पुणे शहरात बंद पडलेल्या जनरल मोटर्सच्या ठिकाणी ‘ह्युंदाई’चा प्रकल्प, अजित पवार यांनी घेतला पुढाकार
Ajit Pawar in Pune : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार शुक्रवारी प्रथमच पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी पुणे शहराचा विकासाचा मॉडेल मांडले. मुख्यमंत्री यांच्या कामात हस्तक्षेप करण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिले.
रणजित जाधव, पुणे | 25 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या बालेकिल्ल्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. अजित पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी सोलापूरवरून साडेपाचशे किलोच्या पुष्पहार मागवला होता. तो घालून अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना अजित पवार यांनी पुणे शहराचा विकासाचा आराखडा मांडला.
काय म्हणाले अजित पवार
मला पहिल्यापासून कुठल्याही विकास कामात लक्ष घालायला आवडत. ती माझी पॅशन आहे. तळेगावमधील जनरल मोटर्सचा उद्योग बंद पडला आहे. त्याठिकाणी ह्युंदाईचा प्रकल्प कसा येईल हे पहिले पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पुणे शहरातील धरणांचा नव्याने विचार करावा लागणार आहे. या धरणांमधून वीज निर्मिती कशी सुरु करावी? यावर विचार करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था टॉप पाचमध्ये आली आहे. आता टॉप तीनमध्ये आणण्याचे उद्दिष्ट आहे.
बैठकीला कोणाला बोलवले नाहीच
मी आजच्या बैठकीला कोणाला बोलवले नव्हते, अगदी माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ही बोलावले नव्हते. माझ्या प्रेमापोटी काही जण आले आहेत. मी माझ्या पक्षातील लोकांना बोलवले नाही तर भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावयचा विषय येत नाही. काम करत असताना अनेक जण बातम्या पसरवत असतात. मुख्यमंत्र्यांच काम अजित पवार करत असल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या. परंतु आम्ही एकमेकांना विश्वासात घेऊन काम करत आहे. आमचे सरकार मजबूत आहे. २०० पेक्षा जास्त आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे.
शरद पवार यांच्या विषयावर म्हणाले…
शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार यांनी म्हटले की, नो कमेंट्स, फक्त विकासाचे बोला. सर्व सामान्य लोकांना विकास हवंय. तुम्ही लोक जसे पाहता, त्या उलट मी पाहतो. मला विकासाशिवाय इतर कशावर ही भाष्य करायचं नाही.