महाराष्ट्रातील 2 बड्या नेत्यांची पुणे विमानतळावर भेट आणि…, काय घडतंय?
महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांची पुणे विमानतळावर बैठक पार पडली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभेची निवडणूक होईल, असं सांगितल्याची चर्चा आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंच्या पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली घडताना दिसत आहेत. निवडणूक तोंडावर असल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. पण हा फॉर्म्युला सहजासहज ठरणं कठीण आहे. कारण एकाच मतदारसंघावर वेगवेगळ्या पक्षांचा दावा केला जातोय. जागावाटपाचा फॉर्म्युला लवकर ठरला नाही तर आगामी काळात नुकसान होऊ शकतं, हे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाडींना माहिती आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. त्यामुळे मोठमोठ्या नेत्यांच्या वारंवार बैठका पार पडताना दिसत आहे. विशेष म्हणजे आता या बैठका थेट विमानतळावर होत असल्याची माहिती मिळत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांमध्ये पुणे विमानतळावर बैठक झाल्याची माहिती आहे. हे दोन्ही नेते राज्याचे उपुमख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पुणे विमानतळावर बैठक झाली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये जागावाटपा संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवार आज सकाळीच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले होते. तिथे त्यांनी सागर बंगल्यावरील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. त्यांच्या बैठकीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
अमित शाह यांच्यासोबतही बैठक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे एक दिवस मुक्कामही केला होता. यावेळी अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडल्याची माहिती समोर आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि इतर नेत्यांसोबत ही बैठक पार पडली होती. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावर चर्चा झाली होती. यावेळी तीनही पक्षांमध्ये सन्मानजनक जागावाटपाचं ठरलं होतं. पण या बैठकीला अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी अमित शाह दिल्लीला जात असताना अजित पवार यांनी मुंबई विमानतळावर त्यांची धावती भेट घेतली होती.