रणजित जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 7 जानेवारी 2024 : नाट्यसंमेलाच्या व्यासपीठावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जोरदार टोलेबाजी केली. तिसरी घंटा वाजली की नाटक सुरू होतं. आमचंही तसं आहे. आमच्याकडे तिसरी घंटा असते आचारसंहितेची. मग आम्ही पोझिशन घेतो. पण एक आहे, चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो. तसं आम्हालाही मिळतो. ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोकं घरी बसवतात, असं सांगतानाच महाराष्ट्राने एक गोष्ट पाहिली. 2019ला राज्यात एक प्रयोग झाला ‘कट्यार पाठीत घुसली’. काळजात नाही… पाठीत घुसली. मग 2022 मध्ये आम्हीही प्रयोग केला ‘आता होती गेली कुठे?’… असे प्रयोग सुरूच असतात, अशी जोरदार टोलेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या गळ्याला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो, पण आताच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात तसा काही पट्टा नाही. आता मी कोणाबद्दल बोलतोय, हे तुम्हाला समजलं असेलच, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.
प्रशांत दामले कालच म्हणाले की, नेते हे 365 दिवस 24 तास नाटकं करतात. तुम्ही बोलले त्यात थोडेफार तथ्य आहे. अभिनेता यात अभी म्हणजे प्रेक्षकांच्या जवळचा नेता. त्यामुळं तुम्ही आता आम्हाला आपल्यातला एक समजता म्हणून तुम्ही आम्हालाही संमेलनाला बोलवता. तुम्ही अध्यक्ष झाल्यावर म्हणाले, मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. आता जरा ही कला आमच्या राजकारण्यांनाही शिकवा, म्हणजे अनेकांना मुख्यमंत्री झाल्या सारखं वाटेल. त्यामुळं अनेक प्रश्नही मिटतील, असं फडणवीस यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.
जब्बार पटेल साहेब आम्ही फाईलांना इंजेक्शन देऊ. त्या वेगाने धावतील. मात्र 2035 साली नेमकं कसं काम चालेल? नाटक कुठे असेल? तंत्रज्ञानामुळं आपण कुठून कुठं पोहचू? याचं इमॅजिनेशन आपण कोणीच करू शकत नाही. आम्ही तर कधीच करू शकत नाही. हे फक्त तुम्हीच करू शकता. आम्ही फक्त तिथपर्यंत नेण्यासाठी तुम्हाला पाहिजे तेवढी मदत करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
जिथे केशरी वातावरण असतं, भगवे वातावरण असतं, तिथे आमचे मन रमतं. आज बघा ना आपला राजा पुन्हा आपल्या जन्मस्थळी विराजमान होतोय. आमच्या कला क्षेत्राने हे रामत्व कायम जपलंय. पहिल नाटक सीता स्वयंवर होतं. पहिला चित्रपट राजा हरिशचंद्र. पहिला बोलपट अयोध्येचा राजा. त्यामुळे रामापासून आपण वेगळे होऊ शकलो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.