पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार, मोदी सरकारने पद्म पुरस्कारांचे निकष बदलल्याचा फडणवीसांचा दावा
सय्यदभाई, गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, पोपटराव पवार यांच्यासह सरस्वती सन्मान विजेते साहित्यिक शरणकुणार लिंबाळे यांचा सत्कार सोहळा पार पडला. पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात फडणवीस यांनी या मान्यवरांच्या कार्याचा गौरव केला.
पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सय्यदभाई, गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, पोपटराव पवार यांच्यासह सरस्वती सन्मान विजेते साहित्यिक शरणकुणार लिंबाळे यांचा सत्कार सोहळा पार पडला. पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात फडणवीस यांनी या मान्यवरांच्या कार्याचा गौरव केला. (Devendra Fadnavis felicitates Padma Award winning dignitaries in Pune)
‘पद्म पुरस्कारांचे निकष पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं बदलले. यापूर्वी अनेक लोक पुरस्कारापासून वंचित राहिले होते. सरकार नाही तर समाज सुचवेल अशा व्यक्तींना पुरस्कार मिळाला आणि मिळायला लागला. कुठलाही समाज परिपूर्ण नसतो. गिरीश प्रभुणे यांच्यासारखी व्यक्ती समाज बदलत असते. मोठं सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य गिरीश प्रभुणे करत आहेत. दलित समाजाची परिस्थिती पाहिली तर अजून बराच काळ आरक्षण राबवावं लागेल अशी स्थिती आहे. मागास समाजातील अनेक घटकांना आरक्षण मिळालेलं नाही. एक मोठा वर्ग आजही आरक्षणापासून वंचित आहे. या वंचित घटकाला आरक्षण मिळेल अशी व्यवस्था उभी करावी लागेल. यासाठी राजकीय इच्छाशक्ती आहे का? हे मी सांगू शकत नाही’, असं मत फडणवीसांनी यावेळी व्यक्त केलं.
‘विचारांचं ट्रोलिंग बंद करणं गरजेचं’
अलिकडच्या काळात आपला विचार हाच अंतिम विचार आहे. दुसऱ्या विचाराला जागा नाही. ही भावना आज समाजात अनेक वेळा पाहायला मिळते. जगभरातील उपेक्षितांना आपण आपल्या देशात स्थान दिलं. त्यांना आपल्या संस्कृतीमध्ये सामावून घेतलं. आता मात्र अशा संस्कृतीमध्ये विचार मांडताना बंधनं येऊ लागली आहेत. खरा विचार मांडला तर त्याला ब्रॅन्डिंग करायचं, ही संकल्पना काही लोकांनी राबवली आहे. त्याला ट्रोलिंग असं म्हटलं जातं. विचारांचं ट्रोलिंग बंद करणं गरजेचं आहे. त्यासाठी समाजाला एकत्र यावं लागेल, असं मत फडणवीसांनी यावेळी मांडलं आहे.
‘..तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नको’
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर काँग्रेसकडून ओबीसींच्या 30 टक्के उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट देण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्याबाबत विचारलं असता नाना पटोले काय म्हणाले हे ऐकलं नाही. मी त्यावर भूमिका मांडणार नाही. एवढंच सांगतो की भाजपची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळत नाही तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
संबंधित बातम्या :
भाजप नेत्यांचे दिल्लीदौरे नेमके कशासाठी? देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट, वाचा सविस्तर
पुणे मेट्रोवरुन भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई? फडणवीस पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करणार
Devendra Fadnavis felicitates Padma Award winning dignitaries in Pune