“आता ‘त्या’ दारुच्या दुकानांवर कडक कारवाई होणार”, देवेंद्र फडणवीस यांचे मोठे संकेत
पुण्यातील हिट अँड रनच्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी नियम न पाळणारे बार आणि पबच्या चालकांना मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे आता नियम न पाळणाऱ्या दारुच्या दुकानांवर कठोर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरुन राज्यातील जनतेचा दबाव वाढल्यानंतर अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी लागली. देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालय गाठत पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी सर्व घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच पोलिसांकडून काय-काय कारवाई करण्यात आली, याचीदेखील माहिती देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरुन पोलिसांवर होत असलेल्या आरोपांचं खंडन केलं. याउलट बाल न्याय मंडळाने दिलेल्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केलं. बाल न्याय मंडळाचा निकाल हा धक्कादायक होता, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काही दारुचे दुकान आणि पबवर कारवाई करण्याबाबतचे मोठे संकेत दिले.
पुण्यात घडलेली अपघाताची घटना ही मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. आरोपीने दारुच्या नशेत संबंधित कृत्य केलं. आरोपी हा दोन ठिकाणी पार्टी केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दारु, पबवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी दोन पबच्या मालकांना अटकदेखील केली आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“या प्रकरणाने लोकवस्तीच्या ठिकाणी बार असल्याचं दिसून आलं. आयडेंटिटी न करता आत सोडलं जात आहे. मोठ्या प्रमाणात ज्या भागात अशा प्रकारचे बार आहेत तिथे नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्हबाबत इफेक्टिव्ह अॅक्शन घेतली जाणार आहे. ज्यांना लायसन्स मिळाले आहेत, ते अटी पाळत आहेत की नाही याची तपासणी केली जाणार आहे. पोलीस हे काम करतील. त्याचबरोबर महापालिका आणि एक्साईज डिपार्टमेंट पाहणार आहे. कोणत्याही प्रकारचं नवीन लायसन्स देताना तो रहिवाशी भाग असू नये, तसेच त्याचे काटेकोर नियम असावेत. त्याची नोट मी पोलीस आयुक्तांना तयार करायला सांगितलं आहे. या प्रकारावर भविष्यात आळा आणता येईल यासाठी या खबरदारी घ्यावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“पालकांनाही विनंती आहे, स्वातंत्र्याचा स्वैराचार होता कामा नये. पहिल्यांदाच ज्युवेनाईल जस्टिस अॅक्ट नुसार पालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही केली जाणार आहे. त्यामुळे पालकांनीही आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल हे काम केलं पाहिजे”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
“रेसिडेन्शिअल एरियातील पब्जबाबत धोरण आणणार आहे. त्यांना नियमावली घालणार. जिथे नियमभंग होतोय ते पब्ज बंद करण्याचे आदेश द्या. जे लोक बार किंवा पबमध्ये जातात त्यांच्याकडे लिगल डॉक्यूमेंट आहे की नाही ते चेक करा. सीसीटीव्ही लावून चेक करा. पोलीस किंवा एक्साईज विभाग चेक करणार. अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून लाँग टर्मसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.