धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी होणार?; तृप्ती देसाई यांनी केलं मोठं विधान
Trupti Desai big claim about Dhananjay Munde resign : पद वाचवण्यासाठीच धनंजय मुंडे अमित शाह यांच्या भेटीला दिल्लीत गेल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यापुढे एक पाऊल टाकत तृप्ती देसाईंनी राजीनाम्याविषयी असा दावा केला.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी क्रूर हत्या करण्यात आली. मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर संशयाची सुई गेली. त्यात विष्णू चाटेपासून ते सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडपर्यंत मोक्का लावण्यात आला. खंडणी, अपहरण आणि खूनासाठी संघटित गुन्हेगारीचा आरोप करण्यात आला. तर या सर्व गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त असल्याचा सत्ताधारी, विरोधक आमदारांनी आरोप केला. आता या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
पद वाचवण्यासाठी दिल्लीवारी
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्या दिल्लीवारीवर आसूड ओढला. पद वाचवण्यासाठी मुंडे हे अमित शाह यांना भेटायला गेल्याचा आरोप त्यांनी केला. ही सर्व मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केला. कुणाचा काय संबंध आहे हे अजितदादा नाही तर कोर्ट सांगेल, असे राऊत म्हणाले. न्यायासाठी जे लढत आहेत. त्यांच्यावर दबाव आणल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.




वैयक्तिक रागातून टार्गेट
अंजली दमानिया यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती काल अजितदादांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना, बैठकी दरम्यान दिली. दमानिया यांनी दिलेली सर्व कागदपत्रे ही मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती दादांनी दिल्याची माहिती समोर येत आहे. तर काही जण माझ्यावर वैयक्तिक रागातून आरोप करत आहेत, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.
तृप्ती देसाई यांचा मोठा दावा काय?
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी उलटसुलट चर्चा होत असतानाच आता तृप्ती देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे हे दिल्लीत अमित शहांना भेटतील आणि भेटून आल्यानंतर त्यांचा राजीनामा होईल, असा दावा देसाई यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अमित शहा जास्त काळ महायुतीची बदनामी सहन करणार नाहीत. आता पर्यंत मुंडे यांचा राजीनामा व्हायला पाहिजे होता. ते जो पर्यंत राजीनामा देत नाहीत तो पर्यंत बीड बदनाम होत राहील. कारण बीडची बदनामी ही त्यांच्या टोळीमुळे झाली आहे, असे देसाई म्हणाल्या. यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्तेंवर तोंडसुख घेतले. गुणरत्न सदावर्ते जे बोलले ते बरोबर आहे. मिकी म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे माऊस फक्त त्यांनी पात्र बदलले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.