पुणे-सातारा महामार्गावर टोल नाक्यावर वादंग, काय आहे कारण?
Pune News : विविध आंदोलनामुळे नेहमी चर्चेत असलेल्या पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर पुन्हा वाद झाला आहे. माथाडी कामगार सेना जिल्हा प्रमुख निलेश माझीरे अन् टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये खडाजंगी झालीय.
विनय जगताप, भोर, पुणे : पुणे (PUNE) सातारा (SATARA) मार्गावरील खेड शिवापूर टोल (KHED SHIVAPUR TOLL) नाक्यावरचा प्रश्न अधूनमधून चर्चेत असतो. या टोल नाक्यावरील टोल वसुली तात्काळ बंद करून, टोलनाका स्थलांतराची मागणी खेड शिवापूर कृती समितीने केली होती. त्यासाठी अनेक आंदोलन केली. त्यानंतर या टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना टोल लागणार नाही, असा निर्णय झाला. या निर्णयानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. स्थानिक वाहनांना टोलमाफीचा निर्णय झाला असला तरी यासंदर्भात अनेक तक्रारी येतात. आता याच विषयावरुन माथाडी कामगार सेना जिल्हा प्रमुख निलेश माझीरे आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला.
काय झाला वाद
पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर माथाडी कामगार सेना जिल्हा प्रमुख निलेश माझीरे आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. टोल नाक्यावर MH12 पासिंगच्या गाड्यांना टोल माफी आहे. त्यानंतर या पासिंग क्रमांक असणाऱ्या वाहनांची अडवणूक केली जाते. वाहनधारकांनादमदाटी अन् शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप निलेश माझीरे यांनी केलाय.
टोल नाक्यावर गुन्हेगार?
खेड शिवापूर टोल नाक्यावर अनेक गुन्हे दाखल असलेले गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं असल्याचा आरोप निलेश माझीरे यांनी केला आहे. या मुजोर कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय. यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांना ही गोष्टी निदर्शनास आणून दिली. त्यांनी यासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलीय. हा प्रकार थांबला नाही तर टोल नाका फोडण्याचा इशाराही यावेळी माझीरे यांनी टोल प्रशासनाला दिला आहे.
स्थलांतराची आहे मागणी
शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने शिवापूर टोलनाका स्थलांतरित करण्यासाठी २ एप्रिल २०२३ रोजी जनआंदोलन पुकारले होते. त्यावेळी जिल्हाधिकारींना बैठक घेतली. कृती समितीच्या वतीने माऊली दारवटकर यांनी टोलनाका हा PMRDA च्या हद्दीत येत असून वाढते नागरिकीकरण आणि औद्योकीकरण या भागात झाले आहे. यामुळे टोलनाका या ठिकाणावरून स्थलांतरित करण्याची मागणी केली. यासंदर्भात सर्व पक्षीय आंदोलने सन २०११ पासून झालेली आहेत. या टोलनाक्याचे स्थलांतर होणे आवश्यक असल्याची आग्रही भूमिका त्यांनी मांडली होती.