‘ससून’चा पदभार स्वीकारताच डॉक्टर म्हस्के ॲक्शन मोडवर; ‘या’ विभागांची पाहणी; हिट अँड रनवर म्हणाले…
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला आहे. या प्रकरणातील आरोपींना पकडल्यानंतर डॉक्टरांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या डॉक्टरांवर ठेवण्यात आला आहे. या डॉक्टरांनी ब्लड सँपल बदलल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणात अनेक गंभीर प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. या प्रकरणांनी गंभीर वळण घेतलं असून अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन डॉक्टर आणि एका वॉर्डबॉयला निलंबित करण्यात आलं आहे. तसेच बीजे मेडिकल कॉलेजचे डीन विनायक काळे यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यता आलं आहे. त्यांच्या जागेवर बारामतीच्या अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. चंद्रकांत म्हस्के यांनी आज ससून हॉस्पिटलचा कार्यभार स्वीकारला असून डॉक्टरांसोबत रुग्णालयाच्या विविध विभागांची पाहणी केली आहे. तसेच विभाग प्रमुखांची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्या प्रकरणी ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि वॉर्ड बॉय अतुल घटकांबळे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा ससून हॉस्पिटलबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले जाऊ लागले आहेत. ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना काल तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.
कौन्सिलिंग करणार
आज पदभार स्वीकारल्यावर डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांनी मीडियाशी संवाद साधला. मी आज सकाळीच ससून हॉस्पिटलचा पदभार स्वीकारला आहे. हॉस्पिटलमधील वॉर्ड, ओपीडी तसेच हॉस्पिटलमधील सर्व विभागांची पाहणी केली आहे. तसेच आज बीजे मेडिकल कॉलेजची कौन्सिलिंग देखील करण्यात येणार आहे. आज विभाग प्रमुखांची बैठक घेऊन रुग्ण सेवा कशी सुधारता येईल आणि येथील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण कश्या पद्धतीने देण्यात येईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असं म्हस्के म्हणाले.
असं होणार नाही
ससून रुग्णालयात जो काही प्रकार घडला त्याबाबत विचारण्यात आलं असता, यापुढे असं होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, ससून हॉस्पिटलच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली असून सर्वांनी नियमानुसार काम करावं अशी सक्त ताकीद देखील म्हस्के यांनी दिली आहे.