प्रदीप कापसे, पुणे | 10 नोव्हेंबर 2023 : नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या ललित पाटील याला एका ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. तीन वर्षांच्या येरवडा कारागृहातील काळात तो तब्बल नऊ महिने ससून रुग्णालयात राहिला. ससून रुग्णालयात ललित पाटील याला पंचतारांकीत सुविधा मिळत होती. त्याला मैत्रिणी भेटण्यासाठी येत होत्या. तो रुग्णालयातून हॉटेलमध्ये जात होता. हॉटेलमध्ये त्याची एक खोली नेहमी बुक असत होती. एका कैद्यास इतक्या सुविधा कशा मिळाल्या? हा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या तपासातून मिळाले आहे. या सर्व सुविधांसाठी ललित पाटील तब्बल 17 लाख रुपये महिन्याला देत होता. यामुळे त्याला यासर्व सुविधा मिळत होत्या.
ललित पाटील उपचाराच्या नावाखाली महिनेमहिने ससून रुग्णालयात राहत होता. त्यासंदर्भात राजकीय आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर होत आहे. ललित पाटील सारखा ड्रग्स प्रकरणातील कैदी तीन वर्षांत रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली आराम करत होता. हवे तसे कुठेही फिरत होता. रुग्णालयातून हॉटेलमध्ये जात होता. त्यासाठी ललित पाटील महिन्याला १७ लाख रुपये देत होता. पोलीस तपासात ललित पाटील याने ही माहिती दिली. १६ नंबर वार्डात ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तो पैसे देत होता. ही धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.
ललित पाटील इनोव्हा कारमधून पुणे शहरात फिरत होता. कैदी असताना मॉलमध्ये जात होता. हवे ते खरेदी करत होता. बिर्याणीचे पार्सल घेण्यासाठी तो जात होता. यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करणाऱ्या पोलिसांनाही धक्का बसला आहे. ललित पाटील याचे हे कारनामे उघड होत असल्यामुळे त्याला मदत करणारे पोलीस कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात दहा पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे. परंतु बडतर्फीची कारवाई अजून कोणावर झाली नाही.