eknath khadse | 137 कोटींची नोटीस मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
eknath khadse | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या समोर गेल्या काही वर्षांपासून अडचणी वाढत आहे. आता खडसे यांना मोठ्या रकमेच्या दंडाची नोटीस आली आहे. ही नोटीस केवळ एकनाथ खडसे यांनाच नाही तर खडसे कुटुंबाला आहे.
रणजित जाधव, पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यामागे पुन्हा एक नवीन संकट आले आहे. आता एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांना बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणात 137 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली गेली आहे. भाजपचे खासदार आणि एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांनाही ही नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबासमोर अडचणी वाढणार आहेत. त्या प्रकरणावर पुण्यात बोलताना एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी मराठा आरक्षणावर त्यांनी मत मांडले.
काय म्हणाले एकनाथ खडसे
पुणे येथे भारत-बांगलादेश क्रिकेट मॅच पाहण्यासाठी एकनाथ खडसे आले आहेत. यावेळी 137 कोटींच्या नोटीससंदर्भात बोलताना खडसे म्हणाले की, मॅच पाहण्यास मी नेहमी उत्सुक असतो. अनेक मॅचेस मी पाहिलेल्या आहेत. 137 कोटी रुपये दंडाच्या नोटीसची मला कल्पना नाही. परंतु हा सर्व प्रकार राजकीय षड्यंत्राचा भाग आहे. यामध्ये माझे विरोधक आमदार चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग आहे. ईडीकडून मला अटक होईल, असे ते सांगत होते. परंतु अटक न होता मला अटकपूर्व जमीन मिळाला आहे.
दंड भरण्याचा प्रश्नच नाही
137 कोटी रुपये दंड भरायचा विषय नाही. यासंदर्भात अपील करता येत. मी कायम विरोधी पक्षात राहिलेला माणूस आहे. मी सत्तेच्या विरोधात नेहमी बोलतो. आताही सत्ता भाजपची आहे. त्यांची चूक मी लक्षात आणून देतो. त्यामुळे मला छळले जात आहे. परंतु ‘नाथाभाऊ झुकनेवाला नहीं’.
यामुळे मला पाठवली जाते नोटीस
मी महसूलमंत्री होतो. तेव्हाची प्रकरणे ते काढत आहेत. ईडी चौकशीतूनही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यांना माझ्याबद्दल काही मिळत नाही. म्हणून वेगवेगळ्या नोटीस मला पाठवत आहेत. मी भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालो तेव्हापासून त्यांनी माझा छळ चालवला आहे. नाथाभाऊ राष्ट्रवादीमधून नाउमेद होऊन पुन्हा भाजपात येतील, असे त्यांना वाटत आहे.
सरकारने शब्द पाळला नाही
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, आरक्षण देईल अन्यथा मी राजकारण सोडेल. परंतु आता ओबीसीचा ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध आहे. यामुळे ओबीसीमधून मराठा समाजास आरक्षण देता येणार नाही. जरांगे पाटील यांना सरकारने दिलेल्या शब्द पळाला नाही. यामुळे मराठा समाजात आक्रोश आहे.