राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाला ‘ही’ गोष्ट सांगावीच लागेल, कारण….
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. या घटना नेमक्या कुठपर्यंत जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पक्षाध्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता कोण पक्षाध्यक्ष होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याला विरोध होतोय. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज पदाधिकारी राजीनामा देताना दिसत आहेत. शरद पवार यांनी विचार करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीबाबत 5 मे ला बैठक होणार असल्याची माहिती समोर आलीय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष निवड करण्यासाठी शरद पवार यांनी एक कमिटी नेमली आहे. ही कमिटी चर्चा करुन पक्षाध्यक्ष ठरवणार आहे. या कमिटीची येत्या 6 मे ला बैठक होणार होती. या बैठकीत नवा अध्यक्ष ठरणार होता. पण शरद पवार यांनी ही बैठक 6 मे ऐवजी 5 मे ला घेण्याची सूचना केली. त्यामुळे आता ही बैठक 5 मे ला होणार आहे. ही समिती जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असं शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसत आहेत.
नवीन अध्यक्ष निवडताना निवडणुकीची गरज नाही?
शरद पवार पक्षाध्यक्ष पदावरुन खरंच पायउतार झाले आणि नवा पक्षाध्यक्ष निश्चित झाला तर राष्ट्रवादीला एक गोष्ट करावीच लागेल, अशी माहिती समोर येत आहे. नवीन अध्यक्षांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवावं लागणार आहे. शरद पवार राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिले तर नवीन अध्यक्ष निवडताना निवडणुकीची गरज नाही. कारण शरद पवारांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे वर्किंग कमिटीला अध्यक्ष निवडीचा अधिकार आहे.
नवीन अध्यक्ष निवडीनंतरचं केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवलं जातं ही प्रक्रिया असते. मात्र शरद पवारांच्या निर्णयावर सगळ्यांची वेट अँण्ड वॉचची भूमिका आहे. मात्र अध्यक्ष निवडीचा अधिकार वर्किंग कमीटीला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे.
राष्ट्रवादी पक्षात नाराजी नाट्य
शरद पवार यांनी अचानक राजीनाम्याची घोषणा केली. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांना कल्पना नव्हती. याउलट पवार कुटुंबियांना याबाबत माहिती होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे काही बडे नेते नाराज असल्याची माहिती समोर आलीय. या नाराजी नाट्यानंतर शरद पवार यांनी खंत व्यक्त केल्याचीदेखील बातमी समोर आली.
“६ मेची बैठक ५ मेलाच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. मी वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं, असं मला आता जाणवत आहे”, असं स्पष्टीकरण पवारांनी दिलं. “जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला “, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.