पुणे | 23 ऑक्टोंबर 2023 : महावितरणकडून वीज चोरी विरोधात मोहीम हाती घेतली आहे. पुणे परिमंडळात वीज चोरी करणाऱ्या ७६६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत महावितरणने २ कोटी ४५ लाख रुपयांचा दंड वीज चोरी करणाऱ्यांना केला आहे. त्यातील ७० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महावितरणकडून वीज चोरी रोखण्यासाठी सुरु असलेली मोहीम कायमस्वरुपी राबण्यात येणार आहे. यामुळे वीज चोरी करू नका, अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.
निरक्षर सर्वेक्षणात दिरंगाई करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ३० ऑक्टोबर पर्यंत उल्लास अॅपवर यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. काही शिक्षक संघटनांनी हे शिक्षण बाह्य काम असल्याचे सांगत बहिष्कार टाकला होता. परंतु हे काम न करणाऱ्यावर थेट कारवाईचा इशारा शासनाने दिला आहे. निरक्षराचे प्रमाण जास्त असणाऱ्या जिल्ह्यात पुणे जिल्हा अव्वल आहे. तर कमी प्रमाण सिंधुदुर्ग जिल्हयात आहे .
पुण्यातील मेडिकल दुकानांवर कारवाई होणार आहे. डिस्काउंटचा बोर्ड लावणाऱ्या औषध दुकानांवर कारवाई करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. सवलतीच्या दरात औषध विकणे मेडिकल विक्रेत्यांना महागात पडणार आहे. आता पुणे शहरातील सर्व मेडिकलची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी होणार आहे.
पुणे शहरात पॅलिस्टाईन नागरिकांसाठी दुआचे अयोजन मुस्लीम समाजाकडून करण्यात आले. पुण्यातील गोळीबार मैदानावर मुस्लिम नागरिकांकडून दुआ मागण्यात आली. पॅलिस्टाईनमधील निष्पाप नागरिकांवर इस्त्रायलकडून होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम धर्मीय नागरिक एकट्वले आले. अनेक नागरिकांनी एकत्र येत इस्रायलचा निषेध केला आहे.
अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका रुग्णाकडून जादा बिल घेतल्याचा आरोप भारती विद्यापीठ रुग्णालयावर झाला आहे. २४ तासांत या रुग्णालयाने ७० हजार रुपयांचे बील लावले असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. या रुग्णाच्या नातेवाईकांनी २७ हजार रुपये बील भरले होते. परंतु, पूर्ण रक्कम भरल्याशिवाय रुग्णाला आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका रुग्णालयाने घेतली. यामुळे संघर्ष सेना आणि धर्मरक्षक दलाच्या वतीने रात्री रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाने तात्काळ डिस्चार्ज दिले गेले.