Pune : फुटपाथ पादचाऱ्यांसाठी की विक्रेत्यांसाठी? सिंहगड रोड परिसरातल्या नागरिकांना रस्त्यावरून चालावं लागतंय जीव मुठीत धरून!
सिंहगड रस्त्यालगत, विशेषत: आनंदनगर आणि वडगाव (कालवा) पुलाजवळील फूटपाथवरून (Footpath) वावरणे खरोखरच खूप अवघड आहे. वृद्ध व्यक्तींनी अशा ठिकाणी चालणे अवघड आणि जीवघेणेदेखील आहे. वाहने धडकण्याचा मोठा धोका आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
पुणे : सिंहगड रोडलगतच्या (Sinhagad road) अनेक फूटपाथवर खाद्यपदार्थांच्या गाड्या, स्नॅक्स सेंटर्स, दुकानदार फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण इतके हाताबाहेर गेले आहे, की नागरिकांना फुटपाथ तर दूरच मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. तर कार चालक आणि दुचाकीस्वार या फळ किंवा भाजी विक्रेत्यांसमोर रस्त्याच्या वरच बेकायदेशीरपणे गाड्या पार्क (Illegal parking) करतात. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते आणि ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वडगाव बुद्रुकचे रहिवासी तसेच येथील ज्येष्ठ नागरिकांच्या मते, सिंहगड रस्त्यालगत, विशेषत: आनंदनगर आणि वडगाव (कालवा) पुलाजवळील फूटपाथवरून (Footpath) वावरणे खरोखरच खूप अवघड आहे. भाजी विक्रेते फूटपाथ व्यापतात. वृद्ध व्यक्तींनी अशा ठिकाणी चालणे अवघड आणि जीवघेणेदेखील आहे. वाहने धडकण्याचा मोठा धोका आहे.
‘पादचाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक’
आनंदनगर आणि विठ्ठलवाडी येथील फूटपाथचा वापर वाहनधारक रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहने चालवण्यासाठी करतात. आनंदनगर आणि हिंगणे भागातून कात्रज-देहू रोड बायपासकडे जाणाऱ्या वाहनधारकांना वडगाव पुलावर यू-टर्न घ्यायचा नाही. त्याऐवजी मोटारवाहक आणि दुचाकीस्वार दोघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या चौकात चुकीच्या बाजूने वेग घेतात. गंगा भाग्योदय सोसायटी आणि नंतर फूटपाथचा वापर करून चुकीच्या दिशेने गाडी चालवतात. हे पादचाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे, असे आनंदनगर भागातील रहिवाशांचे मत आहे.
‘रस्त्यावरूनच चालत जावे लागते’
पु. ल. देशपांडे गार्डनसमोरील नवश्या मारुती मंदिराजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या मते, पादचाऱ्यांसाठी फूटपाथ कुठे आहे? फळ विक्रेते, भाजीपाला फेरीवाले, गॅरेजमालक आणि भोजनालय चालकांनी हे सर्व फूटपाथ ताब्यात घेतलेत. शिवाय ग्राहकांची गर्दी असतेच. त्यामुळे आम्हाला नेहमी रस्त्यावरूनच चालत जावे लागते.
‘नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई’
दत्तवाडी वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, की अनेक ठिकाणी फूटपाथच रस्त्यावरून गायब झाले असून, लोकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. तसेच त्यांची देखभालही केली जात नाही, असेही ते म्हणाले. पुणे महानगरपालिकेने फूटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई करणे आवश्यक आहे. आम्ही नियमितपणे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत आहोत, असेही ते म्हणाले.
‘विक्रेत्यांनी केला कब्जा’
दत्तवाडीच्या रहिवाशांच्या मते, पु. ल. देशपांडे गार्डनजवळील पदपथाचे रुंदीकरण नागरी अधिकाऱ्यांनी केले आहे, पण त्यावर भाजीपाला तसेच फळ विक्रेत्यांनी कब्जा केला आहे. सकाळी किंवा संध्याकाळच्या फेरफटका मारण्यासाठी बागेला भेट देणारे वयस्कर व्यक्तींना बागेत जाण्यासाठी रस्ता मोकळा नसतो. यापूर्वीही अपघात झाले आहेत. पीएमसीने अशा अतिक्रमणांविरुद्ध कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, मत मांडले.
‘अतिक्रमणविरोधी मोहीम’
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाच्या मते, अतिक्रमणाविरोधात मोहिमेसाठी प्रभागनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. ते फूटपाथ आणि रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित करत आहेत. सिंहगड रोडवर अवैध फेरीवाले हटवण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. पुढेही चालू राहील.