पुणे | 20 ऑगस्ट 2023 : स्टार्टअपच्या माध्यमातून देशात अनेक प्रयोग केले जात आहेत. यामुळे केंद्र सरकारने स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या व्यक्तीकडे प्रतिभा असेल तर त्याला कोणीही रोखू शकत नाही. जर आयुष्यात काही तरी मोठे करायचे ठरवले तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही. कधीकाळी पुणे शहरात इन्फोसिस कंपनीत असलेला ऑफिस बॉय आज दोन कंपन्यांचा सीईओ झाला आहे. त्याच्या यशोगाथेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भुरळ घातली. मोदी यांनीही त्यांचे कौतूक केले. दादासाहेब भगत असे त्या युवकाचे नाव आहे.
बीडमध्ये शिक्षण, ऊस तोड मजुराचा मुलगा असलेला दादासाहेब नोकरीसाठी पुण्यात आला. त्यांना इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम मिळाले. कंपनीतील गेस्ट हाऊसवर आलेल्या लोकांना चहा-पाणी देण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली गेली. त्यासाठी त्यांना नऊ हजार रुपये पगार दिला जात होता. सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी इन्फोसिसमध्ये काम करताना त्यांना सॉफ्टवेअरचे महत्त्व समजले. मग यामध्ये शिक्षण घेण्याचे दादासाहेब यांना ठरवले.
दादासाहेब भगत दिवसा इन्फोसिसमध्ये काम करत होतो अन् रात्री शिक्षण घेण्याचे काम केले. त्यांनी ग्राफिक्स डिझायनिंग आणि ॲनिमेशनचा अभ्यास सुरु केला. त्यामुळे त्यांना मुंबईत नोकरी मिळाली. त्यानंतर मुंबईतील नोकरी करताना C++ आणि Python चा अभ्यास केला.
डिझाईन आणि ग्राफिक्स कंपनीत पुन्हा वापरता येणारे डिझाइन आणि टेम्पलेट्सवर काम करण्याची कल्पना त्यांना आली. मग त्यांनी डिझाइन टेम्प्लेट्सची ऑनलाइन विक्री सुरू केली. त्यावेळी त्यांचा कारचा अपघात झाला. मग काही महिने अंथरुणावर राहावे लागले. त्याचवेळी स्टार्टअप उभारण्याचा निर्णय घेतला. मग २०१५ मध्ये Ninthmotion ही कंपनी सुरू केली. या कंपनीसोबत सहा हजार ग्राहक आले.
दादासाहेब यांचे ऑनलाइन ग्राफिक्समध्ये काम सुरु होते. त्यावेळी कोरोनामुळे लॉकडाऊन आले. मग दादासाहेब आपल्या गावी गेले. गावातील काही तरुणांना प्रशिक्षण देऊन कार्यालय सुरू केले. २०२० मध्ये DooGraphics ही कंपनी सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांच्या कामाचे कौतूक केले. आज दादासाहेब यांच्या कंपन्यांचे ग्राहक महाराष्ट्रासह दिल्ली, बंगळुरू येथे आहे. जपान, ऑस्ट्रेलिया आणि यूकेमधून त्यांना ऑर्डरी येतात. त्यांना DooGraphics ला जगातील सर्वात मोठ्या डिझाइन पोर्टलमध्ये बदलायचे आहे.