राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे का? सुप्रिया सुळे यांनी नेमके काय दिले उत्तर
सुप्रिया सुळे यांच्या निवडीनंतर सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाही सुरु झाली आहे, असा आरोप होत आहे. त्यावर नवनिर्विचित कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना जोरदार उत्तर दिले आहे.
अभिजित पोते, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शरद पवार यांनी शनिवारी दिल्लीतून भाकरी फिरवली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड केली. तसेच सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणाची जबाबदारीही सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. या निवडीनंतर सुप्रिया सुळे यांनी रविवारी पुण्यातून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध प्रश्नांना उत्तर देत विरोधकाच्या घराणेशाहीच्या आरोपालाही जोरदार उत्तर दिले.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांच्या निवडीनंतर सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाही सुरु झाली आहे, असा आरोप होत आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, होय ही घराणेशाही आहे, हे मला मान्य आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी आहे. परंतु जे लोक माझ्यावर आरोप करत आहेत, ज्या पक्षातील लोकांकडून ही टीका होत आहे, त्यांच्या पक्षातील घराणेशाही मी संसदेत दाखवून दिले आहे. मला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार शरद पवार यांची मुलगी म्हणून मिळाला नाही. मी संसदेत केलेल्या कामांमुळे मिळाला आहे, असे जोरदार उत्तर सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना दिले. एक बोट जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा बाकीचे तीन बोट त्यांच्याकडे जातात, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
भाजपने विरोधकांआधी सहकारी पक्षाला संपवले
भाजपने विरोधकांना संपवण्याआधी स्वत:च्या सोबत असणाऱ्या सहकारी पक्षाला संपवले. आता विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
ओडिशा अपघातास केंद्र जबाबदार
कॅगचा रिपोर्ट चिंताजनक आहे. हा रिपोर्ट काय सांगतो? याचा गांभीर्याने कधीच विचार केला नाही. देशात इतक्या वंदे भारत ट्रेनची गरज होती का? त्यापेक्षा प्रवाशांची सुरक्षा महत्वाची होती. ओडिशा रेल्वे अपघात केंद्र सरकारच्या दुर्लक्ष झाल्यामुळे झाला आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
लॉबिंगने पक्ष चालत नाही
तुम्ही कार्यकारी अध्यक्ष व्हाव्यात म्हणून अजित पवार यांनीच लॉबिंग केल्याचं सांगितलं जातं, असं विचारताच त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. तुम्हाला ज्या गोष्टी माहीत आहे. त्या मला माहीत नाही. तुमच्याकडून माहिती घेऊन मी माझं जनरल नॉलेज वाढवत आहे.