पुणे-मुंबई ते नागपूरपर्यंत ‘एक्स्प्रेस वे’चे जाळे, राज्यात कुठे, कुठे 4 ते 8 लेनचा महामार्ग वाचा
express highway in maharashtra : राज्यात अनेक ठिकाणी द्रुतगती मार्गाची कामे सुरु आहेत. देशात सर्वाधिक 'एक्स्प्रेस वे'ची कामे महाराष्ट्रात सुरु आहे. त्यात सहा ते आठ लेनची कामे आहेत. यामुळे काही वर्षांत राज्यातील अनेक मार्गांवरुन सुसाट जाता येणार आहे.
पुणे : देशात अनेक ठिकाणी ‘एक्स्प्रेस वे’ची कामे वेगाने सुरु आहे. देशातील सर्वात लांब आणि महत्त्वाचा दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा या वर्षाच्या सुरुवातीला सुरु झाला. दिल्ली ते दौसा असा हा द्रुतगती मार्ग खुला करण्यात आला. राज्यातून समृद्धी महामार्गाचा पहिला अन् दुसरा टप्पाही सुरु झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये द्रुतगती मार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांची कामे वेगाने सुरु आहेत. देशात सर्वाधिक ‘एक्स्प्रेस वे’ ची कामे महाराष्ट्रात होत आहे. त्यात पुणे, मुंबई अन् नागपूर येथूनही अनेक कामे आहेत.
राज्यात किती आहेत कामे
‘एक्स्प्रेस वे’च्या शर्यतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यात २, ४, ६ नव्हे तर संपूर्ण १५ रोड इन्फ्रा प्रकल्पावर काम सुरू आहे. इन्फ्रा न्यूज इंडियाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात १७९ किलोमीटर लांबीच्या ६ लेन ‘एक्स्प्रेस वे’ जालना-नांदेडसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. हा मार्ग समृद्धी एक्स्प्रेस वे ला जोडण्यात येणार आहे. 760 किमी लांबीच्या नागपूर-गोवा (पवनार-पत्रादेवी) शक्तीपीठ द्रुतगती मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम सुरु झाले आहे. चिर्ले-पत्रादेवी कोकण द्रुतगती मार्ग (MSRDC) 500 किमी लांबीच्या 6 लेनसाठी जमिनीचे सर्वेक्षण सुरु आहे. तसेच 225 किमी लांबीच्या 6 लेन पुणे-छत्रपती संभाजीनगर द्रुतगती मार्गासाठी भूसंपादन सुरू असून लवकरच निविदा काढण्यात येईल. हा मार्गही समृद्धीला जोडण्यात येणार आहे.
पुणे-बंगळुरू द्रुतगती मार्ग
पुणे-बंगळुरू द्रुतगती मार्ग 700 किलोमीटर लांबीचा आहे. 8 लेनच्या या मार्गासाठी भूसंपादन सुरू आहे. त्यासाठी लवकरच निविदा मागवल्या जाणार आहेत. त्याच वेळी, 126 किमी लांबीच्या आणि 14 लेनच्या विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर (MSRDC) च्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. याशिवाय पुणे आऊटर रिंगरोड १७३ किमी – ६/८ लेनिंगच्या बांधकामासाठीही निविदा मागवण्यात आल्या आहेत.
नागपूरवरुन द्रुतगती मार्ग
नागपूर-गोंदिया, नागपूर-गडचिरोली द्रुतगती मार्ग आणि गोंदिया-गडचिरोली द्रुतगती महामार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालावर काम सुरू आहे. 180 किमी लांबीच्या पुणे-नाशिक द्रुतगती मार्गाच्या (MSRDC) DPR साठी 6 लेनिंगसह भू सर्वेक्षण सुरू आहे.
समृद्धी एक्स्प्रेस वे फेज 3 (भरवीर खुर्द ते मुंबई) 101 किलोमीटर लांबीचा आणि 6 लेनचा निर्माणाधीन एक्स्प्रेस वे ऑगस्ट 2023 आणि मार्च 2024 पर्यंत टप्प्याटप्प्याने खुला होईल. तसेच नागपूर-विजयवाडा द्रुतगती महामार्गासाठी राज्यात भूसंपादन सुरू आहे.