पुणे : दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पॉलिटेक्निक (Polytechnic) तसेच बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy), हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या (Hotel Management and Catering Technology) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. त्यानुसार विद्यार्थ्याना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 3 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. (Extension has been given for admission to post-matriculation diploma courses)
दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्ज भरल्याची तारीख निश्चित करण्यासाठी आता 3 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 5 सप्टेंबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहे. तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये काही तक्रारी असल्यास त्या सोडवण्यासाठी 6 ते 8 सप्टेंबरदरम्यान वेळ देण्यात आला आहे तर 9 सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
बारावीनंतरच्या पदविका प्रवेशांसाठी दहावीप्रमाणेच तारखा देण्यात आल्या आहेत. 3 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आपली ऑनलाईन नोंदणी करून कागदपत्र्यांच्या स्कॅन प्रती अपलोड करायच्या आहेत आणि पडताळणी करून घ्यायची आहे. 5 सप्टेंबरला बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठी तात्पुरत्या स्वरूपात गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 6 ते 8 सप्टेंबरदरम्यान गुणवत्ता यादीतल्या तक्रारी सोडवल्या जातील आणि 9 सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी पूर्णवेळ दहावीनंतर आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी राज्यात एकूण 1 लाख 3 हजार जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी आतापर्यंत 78 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज निश्चित केला आहे. याबाबतचं परिपत्रक आणि अधिक माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या http://www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर उलपब्ध आहे.
अकरावीसाठी मागासवर्गीय (Backward Class) आणि अनुसूचित जाती-जमातीच्या (SC-ST) आरक्षणातून (Reservation) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रं जमा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रमाणपत्र सादर करणं शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्राशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सोबतच प्रमाणपत्र सादर करण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे.
यापूर्वी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ती वाढवून आता 30 दिवस करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश निश्चिती करताना सुरूवातीला नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पावती सादर करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. पण त्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचं लक्षात आल्यानंतर आता पालकांना 30 दिवसांच्या आत नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करू या आशयाच्या हमीपत्रावरही प्रवेश दिला जाणार आहे.
इतर बातम्या :