VIDEO: ताई आणि मामा… बिल थकीत नसताना वीज कापली, हताश शेतकऱ्याचा मंत्री दत्तात्रय भरणेंसमोरच स्टेजवर आत्महत्येचा प्रयत्न!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमातच एका शेतकऱ्याने व्यासपीठावर दोरीने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (farmer attempt suicide front of ncp mp supriya sule in indapur)
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमातच एका शेतकऱ्याने व्यासपीठावर दोरीने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व्यासपीठावरच होते. त्यांनी या तात्काळ या शेतकऱ्याजवळ जाऊन त्याची समजूत काढली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, मंत्र्यांच्या समोरच शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (farmer attempt suicide front of ncp mp supriya sule in indapur)
इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी येथे खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित काल विविध विकास कामांच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवाजी कृष्णा चितळकर या शेतकऱ्याने व्यासपीठावरच दोरीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची राज्यमंत्री दत्तात्रय भरणे स्टेजवरच समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. या शेतकऱ्याचे थकीत बिल नसतानाही वीज कनेक्शन तोडल्यामुळे लाखो रुपयांचा ऊस जळू लागल्याने हा शेतकरी निराश होता, त्यामुळेच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे.
ऊस जळू लागल्याने हतबल
खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तसेच राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. हा कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर शेतकरी शिवाजी कृष्णा चितळकर हे व्यासपीठावर येऊन ताई व मामा माझे शेतीचे कोणतेही वीज कनेक्शन बिल थकीत नसताना वीज तोडली गेली. लाखो रुपयांचा उभा ऊस जळू लागला आहे. आता मी काय करू? म्हणत या शेतकऱ्याने स्वतःच्या खिशातील दोर काढून फाशी घेण्याचा प्रयत्न केला होता. याप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रसंग सावधान दाखवल्याने व त्या शेतकऱ्याची समजूत काढल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.
‘ते’ कनेक्शन एक दिवस अगोदरच जोडलेले
शिवाजी कृष्णा चितळकर यांचे थकबाकीसाठी 18 ऑगस्ट रोजी तोडलेले वीज कनेक्शन त्यांनी थकबाकी भरताच 20 ऑगस्ट रोजीच जोडून दिले होते. मात्र, खातरजमा करण्यापूर्वी त्यांनी झगडेवाडी येथील कार्यक्रमात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा महावितरणने केला आहे. चितळकर यांना उच्चदाब वितरण प्रणाली (HVDS) योजनेतून 16 केव्हीए क्षमतेचे स्वतंत्र रोहित्र दिलेले आहे. त्यावर त्यांना 3 अश्वशक्ती क्षमतेचे कनेक्शन दीड वर्षांपूर्वी दिले असून त्यांचा ग्राहक क्र. 187180002629 असा आहे. बारामती परिमंडळात शेतीसह सर्वच वर्गवारीतील थकबाकीची वसूली मोहीम जोरात सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून 18 तारखेला चितळकर यांचा वीजपुरवठा 2740 रुपये थकबाकीपोटी खंडित करण्यात आला. वीजपुरवठा खंडित करताच दुसऱ्या दिवशी चितळकर यांनी बील भरले. त्यामुळे त्यांचा वीजपुरवठा 20 ऑगस्टला पूर्ववत करण्यात आला होता. मात्र त्यांनी कोणतीही खातरजमा न करता आंदोलन केल्याचे महावितरणने म्हटलं आहे. (farmer attempt suicide front of ncp mp supriya sule in indapur)
संबंधित बातम्या:
नदीपात्रात गेला, सेल्फी काढायला लागला, पण पाय घसरला, बुलडाण्यात तरुणाचा दुर्देवी अंत