हे आहे ‘पॅशन’ फळ, पुण्यातील शेतकऱ्याने निवडली वेगळी वाट, केली लाखोंची कमाई
Pune farmer Success Story : पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या अशाच एका शेतकऱ्याने पारंपारिक पिके सोडून विदेशातील पॅशन फ्रुटची लागवड केली आहे. या शेतकऱ्यास त्यातून एकरी चार लाख रुपयांचा नफा मिळवला.
राहुल ढवळे, इंदापूर, पुणे | 7 डिसेंबर 2023 : कधी दुष्काळ तर कधी महापूर यामुळे राज्यातला शेतकरी अनेकदा अडचणीत आला आहे. त्यातूनही पारंपारिक शेती सोडून काही शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात. वेगळी वाट निवडणारे हे शेतकरी नवीन पीक पद्धती शोधून लाखो रुपये नफा मिळवत आहेत. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या अशाच एका शेतकऱ्याने पारंपारिक पिके सोडून विदेशातील पॅशन फ्रुटची लागवड केली आहे. या शेतकऱ्यास त्यातून एकरी चार लाख रुपयांचा नफा मिळवला.
शेतीमध्ये नुकसान, सुरु केला प्रयोग
इंदापूर तालुक्यातील कचरवाडी गावचे शेतकरी पांडुरंग बरळ आणि त्यांचे कुटुंबीय नेहमीच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. बरळ कुटुंबियांनी भाजीपाला डाळिंबाच्या शेतीमध्ये नुकसान सहन केले. त्यानंतर जांभूळ, पेरू या फळांची लागवड केली. त्यातही आजूबाजूचे शेतकरी ही पिके घेत असल्याने म्हणावा तसा नफा पांडुरंग बरळ यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतीत नवीन तंत्रज्ञान आणून काहीतरी वेगळे करण्याची त्यांची इच्छाशक्ती होती.
युट्युबवर व्हिडिओ पाहिले…
नवीन तंत्रज्ञानाची शेती करण्यासाठी त्यांनी युट्युबवर व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली. त्यात त्यांना राजस्थानातील किसानगडमध्ये एका शेतकऱ्याने पॅशन फ्रुटची शेती यशस्वीपणे केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बरळ कुटुंबियांनी राजस्थानात जाऊन पॅशन फ्रुटच्या शेतीची माहिती घेतली. त्या ठिकाणी त्यांना फारशी माहिती मिळाली नाही पण आपल्यालाही फॅशन फ्रुटचीच शेती करायची असा निश्चय बरळ कुटुंबियांनी केला.
सुरुवातीला साडेतीन गुंठे जमिनीवर त्यांनी पॅशन फ्रुटची लागवड केली. या पिकाला खतांचा आणि औषधांचा वापर कमी लागत असल्याचे लक्षात घेऊन पांडुरंग बरळ यांनी घरीच रोपे तयार केले. 7×10 जागेत एक एकरावर पॅशन फ्रुटची लागवड केली. त्यानंतर साधारणता चार महिन्यांनी बेंगणी रंगाची फळे येऊ लागली. सध्या या फळांची तोडणी सुरू आहे. पुणे मुंबई या बाजारपेठेत या फळांची विक्री होत आहे. पुणे मुंबईच्या मार्केटमध्ये फॅशन फ्रुटच्या फळाला 130 ते 150 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे.
अनेक आजारांवर गुणकारी
वजनाने हलकी असलेल्या फॅशन फ्रुटच्या फळांचा ज्यूस मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या गंभीर आजारांसाठी महत्त्वाचा मानला जातोय. त्यामुळे या फळांना उच्चभ्रू लोकांमध्ये जास्त मागणी आहे. त्यामुळेच ही फळे सध्या ॲमेझॉन या वेबसाईटवरून देखील विकली जात आहेत. ॲमेझॉनवर आणि उच्चभ्रू मॉलमध्ये या फळांना अडीचशे रुपये भाव मिळत असल्याचे अमर बरळ यांनी सांगितले.