पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवात अचानक आग, प्रेक्षकांची प्रचंड धावपळ, नेमकं काय घडलं?
पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा कार्यक्रम सुरु असताना आगीची घटना घडली. या आगीमुळे एकच खळबळ उडाली. रंगमंचाच्या मागे असणाऱ्या एका खोलीत शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली. सुदैवाने या आगीत कोणतीही हानी झालेली नाही. याशिवाय आगीवर लगेच नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

अभिजीत पोते, Tv9 मराठी, पुणे | 17 डिसेंबर 2023 : पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये आगीची मोठी घटना गेल्या आठवड्यात समोर आली असताना आज पुन्हा आगीची नवी घटना समोर आली. ही आगीची घटना फार मोठी नव्हती. पण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी ही आग लागली. खरंतर आग कोणत्याच ठिकाणी लागू नये. पण पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने आग धुमसत असल्याच्या घटना समोर येताना दिसत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नुकतंच एका फटाक्यांच्या गोदामात स्फोट झाल्याने काही जणांना मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुण्यात चक्क सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या कार्यक्रमात आगीची घटना घडली.
ही घटना घडली तेव्हा प्रेक्षक आणि कलाकारही भयभीत झाले. अतिशय चित्तथरारकर असा तो क्षण होता. प्रेक्षकांची प्रचंड तारांबळ उडाली. सुदैवाने आग भडकली नाही. पण आगीने रौद्र रुप धारण करण्यास सुरुवात केलं होतं. प्रचंड धुर सभागृहात पसरला होता. प्रेक्षक वेड्यासारखे इकडे तिकडे धावू लागले होते. आग लागली हे कळालं, पण नेमकं काय घडलं? ते समजत नव्हतं.
प्रेक्षक बाहेरचा मार्ग धरत होते. यावेळी काही प्रेक्षकांनी नेमकं काय झालंय, त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यावेळी प्रशासन सतर्क असल्याने मोठा अनर्थ टळला. काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.
नेमकं काय घडलं? आयोजकांची प्रतिक्रिया काय?
पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरु असताना आगीची घटना घडली. सवाई गंधर्व कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागली. सुदैवाने या घटनेत कुठलीही हानी झाली नाही. आग छोट्या स्वरूपाची असल्याने कुठलंही नुकसान झालं नाही, अशी माहिती नंतर समोर आली.
रंगमंचाच्या मागे असणाऱ्या एका खोलीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. अवघ्या 15 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आयोजकांना यश आलं. पण अचानक आग लागल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी धावपळ उडाली. आगीवर 15 मिनिटात नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. आता सर्व काही सुरळीत सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली.