पुण्यासाठी मनसेत रस्सीखेच…? चार दावेदार; कुणाची किती ताकद?
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मनसेत रस्सीखेच सुरू झाली आहे. मनसेचे चार नेते लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तशी चर्चाही आहे. चारही नेते माजी नगरसेवक आहेत. पुण्यातील महत्त्वाचे नेते म्हणून परिचित आहेत. मात्र, यापैकी कुणालाही तिकीट जाहीर झालेलं नाही. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे लोकसभेच्या तिकीटाची माळ कुणाच्या गळ्यात टाकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुणे | 29 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. यावेळची लोकसभा निवडणूक सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी अटीतटीची आणि प्रतिष्ठेची असणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रातही राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेनेही स्वबळाचा नारा देत लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकलं आहे. राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा जागा लढवण्याचा मनसेचा निर्धार आहे. त्यामुळे मनसेच्या नेत्यांनी लोकसभा मतदारसंघात कामही सुरू केलं आहे.
भाजप नेते गिरीश बापट यांचं निधन झाल्याने पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. बापट यांची उणीव भरून काढेल असा तुल्यबळ नेता सध्या भाजपकडे नाहीये. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. मनसेनेही पुण्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. विशेष म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी आपल्यालाच तिकीट मिळावं यासाठी मनसेत रस्सीखेच सुरू आहे. मनसेत एकूण चार नेते लढण्यास इच्छुक आहेत.
पुणे लोकसभेसाठी मनसेचे चार नेते इच्छुक आहेत. वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वागस्कर आणि किशोर शिंदे हे यांनी पुण्यासाठी दंड थोपाटले आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजून आपले पत्ते खोलले नाहीत. त्यामुळे कुणाच्या गळ्यात पुण्याचं तिकीट पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कुणाची किती ताकद?
साईनाथ बाबर हे मनसेचे विद्यमान शहराध्यक्ष आहेत. 2012 ते 2017 या पाच वर्षांच्या कालावधीत साईनाथ बाबर यांची बायको पुणे महानगरपालिकेत नगरसेवक होती. तर 2017 2022 या पाच वर्षाच्या कालावधीत साईनाथ बाबर यांनी सुद्धा नगरसेवक पद भूषवल आहे. पुण्यातील मुस्लिम बहुल असणाऱ्या कोंढवा भागातून साईनाथ बाबर हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पण लोकसभेचा विचार करता साईनाथ बाबर यांचा कोंढवा हा प्रभाग शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो.
वसंत मोरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष आहेत. पुण्यातील आणि राज्यातील मनसेचा सर्वाधिक चर्चेत असणारा चेहरा म्हणूनही वसंत मोरे यांच्याकडे पाहिले जाते. वसंत मोरे यांनी 2007 ते 2022 अशी जवळपास 15 वर्ष पुणे महानगरपालिकेत नगरसेवक पद भूषवलं आहे. तर 2 वेळा 2009 आणि 2019 मध्ये मोरे यांनी हडपसर विधानसभा निवडणूक लढवली. पण दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. वसंत मोरे नगरसेवक असणारा कात्रज मतदार संघ देखील बारामती लोकसभा मतदारसंघात येतो.
बाबू वागस्कर यांची देखील शहरात ताकद आहे. बाबू वागस्कर हे दोन वेळा नगरसेवक होते. त्यांची पत्नी देखील एकदा नगरसेवक होती. वागस्कर यांची त्यांच्या मतदारसंघावर पकड आहे. पण लोकसभा मतदारसंघाचं क्षेत्रफळ बघता वागस्कर किती टिकतील हे सांगणं कठिण आहे.
किशोर शिंदे यांनी देखील 2007 ते 2017 या दोनवेळा नगरसेवक पद भूषवलं आहे. तर 2009, 2014 आणि 2019 या तीन वेळा कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. किशोर शिंदे यांना तिन्हीवेळा अपयश आलं. पण शिंदे यांची नेहमी चर्चा झाली आहे.