बारामतीत बायोगॅसच्या टाकीने घेतले चार जणांचे प्राण
बारामतीत बायोगॅसने चार जणांचा प्राण घेतला आहे. बायोगॅस टाकीची साफसफाई करताना एकाच कुटुंबातील चार लोकांचा मृत्यू झाला आहे.
नविद पठाण, बारामती : बारामतीत बायोगॅसने चार जणांचा प्राण घेतला आहे. बायोगॅस टाकीची साफसफाई करताना एकाच कुटुंबातील चार लोकांचा मृत्यू झाला आहे. या चौघांचा मृत्यू गुदमरून झाला आहे. बारामती शहरातील रुग्णालयात त्यांना प्राथमिक उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. प्रकाश सोपान आटोळे, प्रविण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे, बापुराव लहुजी गव्हाणे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. बायोगॅसची ब्रिटीशकालीन पाईपलाईन साफ करताना ही घटना घडल्याचा अंदाज आहे.
बुधवारी (दि. १५) रोजी सकाळी साडे अकरा वाजता खांडज गावच्या हद्दीत असलेल्या आटोळेवस्ती येथे ही घटना घडली. गोबरगॅसच्या टाकीमध्ये पडल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेनंतर तात्काळ चौघांना बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पिता-पुत्राचा मृत्यू
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भानुदास अंबादास आटोळे (वय ६०) , प्रवीण भानुदास आटोळे( वय ३२) हे पिता-पुत्र आहेत. तसेच प्रकाश सोपान आटोळे(वय ५५) हे चुलते आहेत. एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे आटोळे परिवारावर शोककळा पसरली आहे. या घटनेत बाबा पिराजी गव्हाणे(वय ३८) यांचाही मृत्यू झाला आहे.
ती टाकी ब्रिटीश काळातील
बायोगॅसची ती टाकी इंग्रजकाळातील होती. तिच्या चेंबरची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या एक जण उतरला होता. तो टाकीत अडकला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेले अन्य तिघेही या टाकीत अडकले. त्यामध्ये या चौघांचाही गुदमरुन मृत्यू झाला आहे.
पोलिस घटनास्थळी
या घटनेनंतर माळेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील चौघांना बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.