पिंपरी चिंचवड : माजी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या (Fake signature) करून नोकरीचे बनावट पत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड परिसरात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल (Filed a crime) करून घेतला आहे. माजी मंत्री अमित देशमुख आणि वैद्यकीय विभागामधील सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या. त्यानंतर नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक करण्यात आली आहे. आता याप्रकरणी एकावर देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehu road police station) गुन्हा दाखल झाला आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई यांच्याकडे ॲम्बुलन्स चालक या पदावर कॉल लेटर देतो असे सांगून आरोपींनी वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करून घेतल्याचे उघड झाले आहे. शुभम पाटील (वय 26, रा. अंमळनेर, जळगाव) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले, की आरोपीने फिर्यादीकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करून घेतले. तर काही रक्कम रोख स्वरूपात असे एकूण 6 लाख 66 हजार 500 रुपये घेतले. फिर्यादीचा विश्वास बसावा म्हणून आरोपीने माजी मंत्री अमित देशमुख आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाचे वैद्यकीय सचिव असलेले सौरभ विजय यांची खोटी सही व बनावट असे पत्र देऊन फसवणूक केली. यातील आरोपी शुभम पाटीलवर देहू याठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शुभम पाटील काही दिवसांपूर्वी झालेल्या वैद्यकीय भरतीमध्ये वेटिंगवर असलेल्या उमेदवारांना हेरून फसवणूक करत होता, असे तपासात समोर आले आहे. अशाच प्रकारच्या फसवणूक प्रकरणात नवी मुंबईतदेखील शुभम पाटीलवर गुन्हा दाखल असून त्यात तो अटक आहे. आता या आरोपीचा ताबा आम्ही घेत आहोत. बनावट कागदपत्र कुठे तयार केली, आणखी कुणाला फसवले, इतर कोणते गुन्हे त्याने केले याचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.