Pune crime : बांधकाम व्यावसायिकाची पुण्यात फसवणूक; बडतर्फ पोलिसाचा पुतण्या चतु:श्रृंगी पोलिसांच्या ताब्यात
आरोपी जयेश जगताप हा मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौपाटी येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आरोपी दाखल गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.
पुणे : जमिनीच्या व्यवहारात बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक (Cheating) करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. फसवणुकीसह खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बडतर्फ पोलीस शैलेश जगताप याचा पुतण्या जयेश जितेंद्र जगताप (वय 21, रा. घोरपडे पेठ, पोस्ट ऑफिसजवळ, पुणे) याला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक एकच्या पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपी जयेश जगताप हा मोक्का कारवाई झाल्यानंतर फरार झाला होता. जयेश जगताप याच्यावर चतु:श्रृंगी पोलीस (Chaturshringi police) ठाण्यात कलम 420, 406, 506(2), 386, 387, 388, 389, 120 (ब), 109, 34 याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) यानुसारही कारवाई करण्यात आली होती. विविध कलमांतर्गत आरोपी असलेला जयेश फरार होता.
सापळा रचून अटक
जयेश जगताप याला रविवारी (29 मे) एकच्या सुमारास मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौपाटी येथून अटक करण्यात आली आहे. दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक एकचे पोलीस शिपाई सुमीत ताकपेरे यांना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी जयेश जगताप हा मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौपाटी येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपी चतु:श्रृंगी पोलिसांच्या ताब्यात
आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आरोपी दाखल गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला चतु:श्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.