पुणे : पुणे शहरातील लोकांना मोफत वायफाय मिळणार आहे. पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी ही सुविधा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून ही सुविधा दिली जाणार आहे. या सुविधेसाठी ४५०० दुकानदारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक लहान-मोठ्या भागांत या योजनेचा लाभ होणार आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या योजनेसंदर्भात माहिती दिली. या योजनेनंतर अनेकांना महाग डाटा प्लॅन खरेदी न करता ऑनलाइन कामे करता येणार आहे.
काय आहे योजना
पुणे प्रादेशिक विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांना मोफत इंटरनेट योजनेची माहिती दिली. ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी ही योजना सुरु करण्याची घोषणा केली होती. या योजनेचे नाव पीएम वाणी योजना आहे. त्या माध्यमातून मोफत इंटरनेट मिळणार आहे. या योजनेद्वारे सार्वजनिक ठिकाणी वाय-फायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. पुण्यात स्वस्त धान्य दुकानामधून ४५०० ठिकाणी ही योजना सुरु करण्यात येणार आहे.
दुकानदारांची नोंदणी पूर्ण
रास्त भाव दुकानातून ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध करून पीएम-वाणी योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमात पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. या योजनेंतर्गत ४५०० दुकानांची नोंदणी केली आहे. आता या योजनेच्या काम संपूर्ण राज्यभर करण्यात येणार आहे.
काय करणार दुकानदार
रास्त भावाची दुकाने असणारे दुकानदार त्यांचा व्यवसाय चालवीत असतानाच वाय-फाय राउटर घेतील. या योजनेंतर्गत सार्वजनिक ठिकाणी असणारे नागरिक सतत इंटरनेटशी जोडले जाणार आहेत. यामुळे इंटरनेटचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. या योजनेनंतर महाग डेटा प्लॅन घेण्याची गरज नागरिकांना पडणार नाही.
आजच्या काळात सर्व कामे ऑनलाइन होतात. परंतु ही कामे करण्यासाठी अनेक नागरिकांकडे इंटरनेट सुविधा नसते. तसेच काही जणांकडे इंटरनेट असले तरी तिचा वेग कमी असतो. यामुळे अनेक नागरिकांच्या कामात व्यत्यय येतो. देशात डेटा प्लॅनचे दर खूप महाग आहेत. त्यामुळे ही मोफत वायफाय योजना अनेकांना उपयुक्त ठरणार आहे.