पुण्यात विसर्जन मिरवणुकीत राडा, पोलिसांकडून बळाचा वापर, भिवंडीतही दगडफेक
pune ganesh visarjan: पुण्यातील इतर मार्गाने जाणाऱ्या मिरवणुकीत साऊंड सिस्टीम सुरु करण्यात आल्या होत्या. परंतु टिळक रोडवरील सिस्टीम बंद होती. यामुळे मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासच्या मंडपासमोरच ठिय्या आंदोलन केले.
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला 24 तास झाले आहेत. त्यानंतरही अजून ही मिरवणूक सुरुच आहे. बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत 116 गणेश मंडळाचे विसर्जन झाले आहे. तर दुपारी 1 पर्यंत 171 मंडळे अलका चौकातून पुढे गेलेत. विसर्जन मिरवणूक संपण्यास अजून दोन ते तीन तास लागण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस हार घालून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड या मार्गावरून अजूनही मिरवणूक सुरू आहे. मिरवणूक शांततेत सुरु आहे. परंतु अलका चौक आणि टिळक रस्त्यावर पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. भिवंडीत मूर्तीवर दगडफेक झाल्यामुळे तणाव निर्माण झाला.
अलका चौकात तणाव
पुण्यात विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्ते अन् पोलिसांची बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. गणेश मंडळाचे कार्यकर्ते ऐकत नसल्यामुळे पोलिसांकडून बळाचा वापर झाला. अलका चौकात एक सार्वजनिक गणेश मंडळ एका जागी थांबून डीजे वाजवत होते. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या मंडळाची मोठी कोंडी झाली. त्या मंडळास पोलिसांनी वारंवार सांगून देखील कार्यकर्ते मंडळाची मूर्ती पुढे नेत नव्हते. यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या ठिकाणी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी येत वाद थांबावत त्या गणेश मंडळाला पुढे सरकवले.
टिळक रस्त्यावर साऊंड सिस्टीमवरुन वाद
टिळक रस्त्यावर साऊंड सिस्टिमवरुन वाद झाला. गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत साऊंड सिस्टिम बंद ठेवली होती. परंतु त्यानंतर सकाळी सहा वाजता पोलिसांनी साऊंड सिस्टीम सुरु करु दिली नाही. पुण्यातील इतर मार्गाने जाणाऱ्या मिरवणुकीत मात्र साऊंड सिस्टीम सुरु करण्यात आल्या होत्या. यामुळे मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासच्या मंडपासमोरच ठिय्या आंदोलन केले. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून साऊंड सिस्टिमवर गणपतीची आरती लावण्यात आली. त्यानंतर मिरवणूकला पुन्हा जल्लोषात सुरुवात झाली.
भिवंडीत मूर्तीवर दगडफेक
भिवंडीतील घुंघटनगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी कामवारी नदीकडे रात्री 1 वाजता जात असताना मूर्तीवर दगडफेक झाली. या घटनेत गणेशाच्या मोठ्या मूर्ती खंडीत झाली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. तणाव वाढल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला. जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांना पकडत नाहीत, तोपर्यंत मूर्तीचे विसर्जन केले जाणार नाही, अशी भूमिका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली.