नगर : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही जिथे जाते तिथे गर्दी गर्दी आणि गर्दी होते. या कार्यक्रमात तिच्यावर नोटांची बरसात होते. पण टग्यांचीही कार्यक्रमात गर्दी असल्याने हुल्लडबाजीही होते. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करून जमावाला शांत करावं लागतं. तर कधी कधी गौतमी पाटीललाही आपला कार्यक्रम अर्ध्यावर सोडून जावं लागतं. जमावाला आवरणं अशक्य असल्याने तिला हा निर्णय घ्यावा लागतो. काल नगरमध्येही असाच प्रकार घडला. कार्यक्रमाला गर्दी जमली, नोटांची बरसात झाली. पण हुल्लडबाजीमुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. तरीही हुल्लडबाजी काही थांबेना, अखेर गौतमी पाटील हिला आपला कार्यक्रम गुंडाळावा लागला.
नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आणि राडा अस आता समीकरणच बनलंय….राहाता येथील गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. गौतमीची लावणी सुरू असताना काही अतिउत्साही तरुणांनी तिच्यावर नोटांची उधळण केल्याने सुरूवातीला 15 मिनटे कार्यक्रम थांबवावा लागला. गर्दी नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. मात्र तरीही हुल्लडबाजी सुरूच राहिल्याने कार्यक्रम आटोपता घेत मोठ्या बंदोबस्तात गौतमीला तेथून बाहेर काढावे लागले.
या कार्यक्रमात काही अतिउत्साही तरुणांनी जोरदार घोषणाबाजी आणि हुल्लडबाजी सुरू केल्याने कार्यक्रमात वारंवार व्यत्यय येऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी या तरुणांवर लाठीमार केला. त्यामुळे जमाव अधिकच खवळला आणि सैरभैर झाला. जो तो मिळेल त्या दिशेने पळू लागला. त्यामुळे एकच धांदल उडाली. त्यानंतर गौतमीला काही होऊ नये म्हणून पोलिसांनी तिच्या भोवती कडं केलं आणि तिला सुरक्षितपणे कार्यक्रम स्थळाहून बाहेर आणलं.
दरम्यान, काल साताऱ्यातील खोजेवाडी येथे पाच वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याचा वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी चक्क गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमास पंचक्रोशीतील गौतमी पाटीलचे चाहते उपस्थित होते. अनेक गाण्यांवर गौतमी पाटील हिने आपल्या नृत्याविष्काराने तरुणाईला नाचण्यास भाग पाडले.
विशेष म्हणजे या कार्यक्रमास महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी त्यांनी साताऱ्यात कार्यक्रम करून खूप चांगला अनुभव येत असून अलिकडच्या दिवसात कार्यक्रमाच्या निमित्ताने सारखा येण्याचा योग येत असल्याची प्रतिक्रिया गौतमी पाटील हिने व्यक्त केली.