सरकार मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यास जाणार का? मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले उत्तर
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या पाच दिवसांत मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यास सरकारकडून कोणीही गेले नाही. सरकारकडून आता त्यांना कोणी भेटण्यास जाणार का? या प्रश्नावर मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे.
प्रदीप कापसे, पुणे | 29 ऑक्टोंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीव्ही 9 मराठीवर शनिवारी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जोपर्यंत मी बोलू शकत आहे, तोपर्यंत चर्चेला या. चर्चेसाठी येणाऱ्यांना कोणी अडवणार नाही, असे रविवारी स्पष्ट केले. गेल्या पाच दिवसांपासून सरकारकडून चर्चेला कोणी आले नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आता सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चेला कोणीच का गेले नाही? या प्रश्नाचे उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे. सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले. एक नाही तर 100 वेळा जाऊन त्यांची भेट घेऊ, असे त्यांनी म्हटले.
काय म्हणाले शंभूराज देसाई
सरकारकडून चर्चेला कोणीच का गेले नाही? या प्रश्नावर बोलताना शंभूराज देसाई यांनी सांगितले की, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले होते, त्यावेळीच आमचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना फोन केला होता. मात्र त्यावेळी जरांगे पाटील यांनी आमच्या गावात कुणीही पुढारी येऊ नका, असे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यास कोणीच गेली नाही. आता मनोज जरांगे पाटील म्हणत असतील तर सरकार नक्कीच चर्चेला तयार आहे. आम्ही एक नाही तर 100 वेळा जाऊन त्यांची भेट घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
समितीला दिली दोन महिन्यांची मुदतवाढ
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. परंतु सध्या तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. यामुळे तेलंगणा सरकारकडून मराठा समाजातील नोंदीसंदर्भातील कागदपत्रे मिळण्यास अडचण येत आहे. तरी यासंदर्भात लवकरच तोडगा निघेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी अद्यापपर्यंत 23 बैठका घेतल्या आहेत. सोमवारी पुन्हा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आहे. आम्ही मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.