अयोध्येतील राममंदिर उद्ध्वस्त व्हावे, असे काही लोकांचे मनसुबे… गोविंदगिरी महाराज यांचा रोख कुणाकडे
ram temple construction ayodhya | अयोध्या येथे उभारण्यात येणारे श्री राममंदिर उद्ध्वस्त व्हावे, असे काही लोकांचे मनसुबे आहेत. यामुळे आता केवळ रामाची प्रतिष्ठापना करून आणि मंदिर पूर्ण बांधून चालणार नाही तर आपली मंदिरे पुन्हा, पुन्हा का तोडली गेली? याचा विचार केला गेला पाहिजे.
योगेश बोरसे, पुणे | 11 डिसेंबर 2023 : अयोध्यात श्री राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरु आहे. येत्या जानेवारी महिन्यात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. एकीकडे या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरु असताना श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्याचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी पुणे येथे धक्कादायक विधान केले आहे. राममंदिर उद्ध्वस्त व्हावे, असे काही लोकांचे मनसुबे आहेत. यामुळे आता रामाची प्रतिष्ठापना करून आणि मंदिर पूर्ण बांधून चालणार नाही तर आपली मंदिरे पुन्हा, पुन्हा का तोडली गेली? का उद्ध्वस्त केली गेली याची कारण मीमांसा होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी तुकडे तुकडे गँग आणि त्या पद्धतीच्या मनोवृत्तीवर टीका केली.
तुकडे-तुकडे गँगचे मनसुबे
अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील भगवान रामच्या वस्त्रांसाठी ‘दोन धागे श्रीरामासाठी’ या उपक्रमाचे उद्घाटन पुणे येथे करण्यात आले. श्रीरामाचा पोशाख पुणे येथून विणून घेतला जात आहे. लोकसहभागातून हा उपक्रम सुरु आहे. याचे उद्घाटन गोविंदगिरी महाराज यांनी केले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी तुकडे, तुकडे गँगवर कठोर टीका केली. हे मंदिर जेव्हा उभे होत आहे, त्याच वेळेला अनेक लोकांचे मनसुबे असे आहेत की मंदिर उभे होऊ नये. देशात ज्याप्रमाणे जुनी मंदिरे निस्तनाबूत झाली, तसेच काहीतरी याही मंदिरासाठी करता यावे, अशा प्रकारची मनसुबे तुकडे तुकडे गँगचे आहे. यामुळे आता सर्वांना जरब निर्माण करण्याची गरज आहे. आता केवळ रामाचे मंदिर उभा करून चालणार नाही तर समर्थ राष्ट्र मंदिर उभा करण्याची गरज आहे. हे राष्ट्र बलशाली झालं पाहिजे.
योगी यांचे केले समर्थन, दिले असे उदाहरण
एकदा रामायण वाचताना मला विचार आला “When crime is confirmed encounter is the only solution” म्हणजे गुन्हे वाढले की एन्काऊंटर हाच उपाय आहे. रामायणात वाली याचे गुन्हे वाढले होते. त्यामुळे प्रभू राम यांना त्याचे एन्काऊंटर केले. त्यामुळे आता आपल्या देशात योगीजी यांनी जे “बुलडोझर कल्चर” सुरु केले आहे, ते गरजेचे आहे.