भूषण पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कोल्हापूर | 12 नोव्हेंबर 2023 : अजितदादा गटाने जिल्हाध्यक्षांचे बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केला होता. जयंत पाटील यांच्या आरोपाला अजितदादा गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. झोमॅटो असो किंवा स्विगी असो. आमचा सेल आहे ना? घरोघरी अन्न पुरवणारा कामगारांचा सेल आहे. त्याद्वारे आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल केली असेल. ती खरी की खोटी ठरवण्याचा अधिकार कुण्याही व्यक्तीला नाही. ते निवडणूक आयोग ठरवेल, असा पलटवार हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटावर केला आहे. बोगस प्रतिज्ञापत्रचा मुद्दा शिवसेनेच्यावेळीही घडला होता. तेव्हा कोल्हापुरात चौकशी पथक आलं होतं. चौकशी करून गेले होते. राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांचा आहे. चिन्ह आमचंच राहणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरून तुम्हाला लक्षात आलं असेल, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
अजित पवार यांना ताप आला की सहकाऱ्यांचा मनस्ताप, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार हे तोंडावर सांगणारी व्यक्ती आहे. ते नाटक करणारे नाहीत. त्यांनी आयुष्यात ते केलं नाही. त्यांना खरोखरच डेंग्यू झाला होता. आम्ही त्यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठका घेतल्या होत्या. तेव्हाही ते आजारी होते. त्यांच्या प्लेट्सलेट कमी होत होत्या. आता वाढत आहेत.
अशक्तपणा आहे. त्यांचा आवाज बसलेला होता. आता ते व्यवस्थित झाले असतील. अजितदादा यांच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्ये आहे, ते म्हणजे ते आत एक आणि बाहेर एक असं करणारे नाहीत. ते तोंडावर सरळ सांगणारे आहेत. वस्तुस्थिती सांगणारे निर्भिड व्यक्ती आहेत, असं मुश्रीफ म्हणाले.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची बाजू घेतली. छगन भुजबळ हे आरक्षणाची कळकळ असलेले नेते आहेत. आरक्षणावर ते स्पष्ट भूमिका घेतात. शिवसेनेत असताना मंडल आयोगाच्यावेळी त्यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाले होते. त्यांची भूमिका स्पष्ट आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता. अशी त्यांची भूमिका आहे. आमच्या मंत्रिमंडळाचीही तीच भूमिका आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनीही केली आहे. जेव्हा जातनिहाय जनगणना होईल तेव्हा दूध का दूध पानी का पानी होईल, असंही ते म्हणाले.