देहू, पुणे : देहूत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla) लगबग सुरू झाली आहे. पंढरपूर वारीचा सोहळा आणि या सोहळ्यासाठी हजारो वारकरी देहूत दाखल होतील. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी देहूच्या मुख्य मंदिरासह देहू परिसरात महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय विभागाकडून प्रथमोपचार पथक (First Aid Squad) तैनात करण्यात आले आहे. या माध्यमातून वारकऱ्यांना योग्य तो प्राथमिक उपचार सल्ला देऊन औषध, गोळ्या दिल्या जात आहेत. दोन वर्ष हा सोहळा पायी झाला नव्हता. यंदा मात्र उत्साहात सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी येणार आहेत. सध्या देहूनगरी (Dehu) वारकऱ्यांनी दुमदुमली आहे. 20 जूनला पालखीचे प्रस्थान देहूतून होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य पथके वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहेत.
विविध वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. वारकऱ्यांना कोणताही त्रास झाल्यास त्यांची तपासणी आणि मोफत औषधोपचार केला जात आहे. देहूमध्ये चार ते पाच पथके आहेत. प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस डॉक्टर, सिस्टर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट या सर्वांची टीम करून प्रत्येक ठिकाणी ती तैनात करण्यात आली आहे. त्यामध्ये एक मुख्य मंदिर, दुसरे वैकुंठ गमन मंदिर, तिसरे गाथा मंदिर आणि चौथे आमचे प्रायमरी रेफरन्स सेंटर म्हणून पीएससी देहू याठिकाणी ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पथकातील डॉक्टरांनी दिली.
जवळपास सात ते आठ रुग्णवाहिका असणार आहेत. त्याशिवाय 108चीदेखील संकल्पना आहे. याद्वारे एखादा रुग्ण गंभीर असेल तर त्याला ससूनला पाठविण्याची जबाबदारी असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरदेखील आरोग्य पथकाद्वारे सुविधा पुरविण्यात आली आहे. अँटिजेन करायची असेल किंवा एखाद्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असतील त्यांच्यासाठी अँटिजेन टेस्टची सुविधा उपलब्ध आहे. त्यासोबतच कोरोनाली लस कोणाला घ्यायची असेल, तर त्यासाठीची सुविधाही वारकऱ्यांसाठी पुरविण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणांवर ही सुविधा असणार आहे.