पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज, प्रशासनाने काय केली तयारी
Pune Rain News : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी दरड कोसळली. या दुर्घटनेत 100 हून अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज आहे. यामुळे प्रशासनाने तयारी केली आहे.
अभिजित पोते, पुणे | 20 जुलै 2023 : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळ गडाजवळ असलेल्या ठाकूरवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात 100 हून अधिक दाबले गेले आहेत. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी सुरु असल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील दरडप्रवण अन् पूरप्रवण गावांवर जिल्हा प्रशासनाचे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. तसेच दरड आणि पूरप्रवण गावांशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयात थांबण्याचे आदेश जिल्हाधिकरींनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे विविध खातेप्रमुखांची बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला.
किती गावांवर असणार लक्ष
पुणे जिल्ह्यातील २३ गावांवर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. या गावांवर दरड कोसळण्याची शक्यता आहे. तसेच ८४ गावे पूरप्रवणग्रस्त आहेत. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे या गावाशी संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच यंत्रणा किती सज्ज ठेवली आहे, त्याची माहिती घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील पाऊस, संभाव्य अतिवृष्टी, पूरस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
कुठे कोणता अलर्ट
पुणे आणि रायगड जिल्ह्यासाठी २० रोजी मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामुळे सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आपतीप्रसंगी मदत कार्य तातडीने मिळावे, यासंदर्भात तयारी केली गेली आहे.
रत्नागिरीत जोरदार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील नारंगी नदीला पूर आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मगरी मानवी वस्तीमध्ये आल्या होत्या. खेड येथील नारंगी नदीतील मगरी थेट रस्त्यावर आल्यामुळे एकच घबराट निर्माण झालीय. दापोली खेड रस्त्यावर मगरी सध्या मुक्त विहार करताना पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर खेड शहरांमधल्या काही भागांमध्ये घरांमध्ये साप दिसत आहेत.