पुणे | 1 ऑक्टोंबर 2023 : महाराष्ट्रात मान्सूनचा हंगाम संपला आहे. आता परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. यंदा राज्यात उशिराने मान्सून दाखल झाला. त्यानंतर अनेक जिल्ह्यात पावसाने सरासरी अद्याप गाठली नाही. सप्टेंबर महिन्यात सुरु असलेला पाऊस ऑक्टोंबरच्या सुरुवातीला कायम आहे. राज्यात पुढील चार दिवस पाऊस असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात शनिवार रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू आहे.
पुणे परिसरात रविवारी दिवसभर पावसाचा अंदाज आहे. तसेच पुढील तीन दिवस पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस असणार आहे. हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावासाचा अंदाज आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कराडमध्येही रविवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील चार दिवस पाऊस असणार आहे. कोकणातही पुढील चार दिवस मुसळधार पाऊस असणार आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 97% म्हणजेच 28 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पुणे परिसरातील टेमघर वगळता इतर सर्व धरणे भरले आहेत. पुणे परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पुणे शहर आणि घाट परिसरात चांगला पावासाची शक्यता व्यक्त केली आहे.
मावळ तालुक्यात पडत असलेला परतीचा पाऊस हा भातपिकांसाठी पोषक आहे. सध्या इंद्रायणी भात पिके जोमात आले आहे. सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकाला संजीवनी मिळाली आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे. परंतु ज्या ठिकाणी पावसाचे जास्त पाणी साठत असेल त्या ठिकाणी सांडव्यातून पाणी बाहेर काढावे, अशी सूचना मावळ कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांनी केली आहे.