पुण्यात आज पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात, अनेक ठिकाणी साचले पावसाचे पाणी
पुणे शहरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नालेसफाईचे दावे फोल ठरले आहेत. यावरुन आता राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. मनसेने या विरोधात आंदोलन केले आहे.
पुण्यात आज पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज चौथ्या दिवशी देखील पुण्यात मुसळधार पाऊस होत आहे. स्वारगेट, मनपा, शिवाजी नगर , कात्रज भागात मुसळधार पाऊस होत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. पुणे शहरात एका दिवसात 100 मिमी पाऊस पडला आहे. पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठत आहे. याचा जाब विचारण्यासाठी आता काँग्रेस सुद्धा मैदानात आहे. पुणे शहर काँग्रेसचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्त यांची भेट घेतली आहे. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या दालनात काँग्रेस कार्यकर्ते यांनी त्यांची भेट घेतली.
मनसे देखील आक्रमक
मनसे देखील महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक बोटीत बसून पालिका प्रशासनाचा निषेध केला. पहिल्या पावसात पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. नालेसफाई झाली नसल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचा आरोप मनसेने केला आहे. पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली.
दुसरीकडे शहरातील नालेसफाई संदर्भात भाजपचे शिष्टमंडळ देखील महापालिका आयुक्तांना भेटून निवेदन देणार आहे. भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहेत. शहरात एकाच पावसाने नालेसफाईचे दावे फोल ठरले आहेत.
सोलापुरात ओढे-नाले ओव्हर फ्लो
दुसरीकडे सतत पडत असलेल्या पावसामुळं सोलापूर शहरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. सोलापुरातल्या मडकी वस्ती परिसरात असलेला ओढा देखील ओव्हरफ्लो झालाय. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना देखील धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरु आहे. अनेक नागरिक नाल्यातून वाहत असलेल्या पाण्यातून वाहतूक करत आहेत. रस्त्याच्या कडेला कोणतेही सुरक्षा कठडे नाहीत. महापालिकेकडून देखील कोणतीही उपाययोजना नाही. त्यामुळे महापालिकेच्या नालेसफाईचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळतेय.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात मान्सून दाखल झाला आहे. मुंबईत देखील पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली येथे देखील पावसाने हजेरी लावली आहे.