Rain : राज्यात पुढील चार, पाच दिवस मान्सून सक्रीय, कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट

| Updated on: Jul 17, 2023 | 9:12 AM

weather update and rain : राज्यात अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परंतु आता राज्यात पाऊस सक्रीय होणार आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Rain : राज्यात पुढील चार, पाच दिवस मान्सून सक्रीय, कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट
Follow us on

पुणे | 17 जुलै 2023 : अर्धा जुलै महिना झाला आहे तरी राज्यांत अजूनही पुरेसा पाऊस नाही. राज्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याची पातळी खालवली आहे. उशिरा आलेला मान्सून त्यानंतर पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पाऊस सुरु झालाय. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहणार आहे. तसेच कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे. यंदा प्रथमच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चंद्रपूरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई शहराला 3 दिवसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे जिल्ह्यास सोमवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

हे सुद्धा वाचा

पाऊस आता सक्रीय होणार कारण

राज्यात पाऊस आता सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय झाले आहे. यामुळे 17 व 18 जुलै रोजी संपूर्ण कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.

मुंबईत दमदार हजेरी

मुंबई शहरात सोमवारी पहाटेपासून दमदार हजेरी लावली आहे. दादर, माटुंगा ,माहीम हाजी अली परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरीच्या केवळ 83 टक्के पाऊस पडलेला आहे. कमी पावसामुळे जिल्ह्यातील पेरण्या देखील रखडलेल्या आहेत. धुळे जिल्ह्यात केवळ 75 टक्के पूर्ण झालेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे.

राधानगरी धरण ५० टक्के

कोल्हापुरात जिल्ह्यातील राधानगरी धरण 50 टक्के भरले आहे. धरणात 4.18 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा साठा मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात 6.15 टीएमसीहुन अधिक पाणीसाठा होता. जिल्ह्याच्या अनेक भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर धरणातला पाणीसाठा मात्र चिंताजनक आहे. काळमवाडी धरणात केवळ 5.18 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवसात काळमवाडी धरणात 14 टीएमसी पाणीसाठा होता.