गिरीश गायकवाड, मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर आणि अस्थिव्यंगोपचार पथक प्रमुख डॉ. देवकाते यांच्यावर शुक्रवारी कारवाई झाली. या दोघांचे निलंबन करण्यात आले. परंतु डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावरील कारवाई राज्य सरकारने केली नाही, ती न्यायालयाने केली. त्यात राज्य सरकारचे कोणतेही कर्तृत्व नाही. डॉक्टर संजीव ठाकूर यांना अटक केली तर अनेक गोष्टी बाहेर येतील, असा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? असा प्रश्न त्यांनी केला.
सुषमा अंधारे यांनी सांगितले की, ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर आणि डॉक्टर विनायक काळे यांच्यात वाद आधीच सुरु होता. या प्रकरणात मॅटने डॉक्टर विनायक काळे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर ठाकूर यांनी उच्च न्यायालयामध्ये अपील केले होते. शुक्रवारी उच्च न्यायालयाने डॉक्टर संजीव ठाकूर यांची नियुक्ती चुकीची ठरवली आणि पद मुक्त केले. नेमकं कालच ससून संबंधित चौकशी अहवाल आला आणि त्या चौकशी अहवालामध्ये डॉक्टर ठाकूर यांना दोषी ठरवले. यामुळे ही कारवाई राज्य सरकारने केली नाही तर न्यायालयामुळे झाली. डॉक्टर ठाकूर यांची पदमुक्ती ही सरकारने केली नाही तर ती न्यायालयीन निकालामुळे झालेली आहे. यात सरकारचे कसलेही कर्तृत्व नाही.
राजकीय मेहरबानीमुळे ससूनच्या डीन पदावर संजय ठाकूर यांना बसवण्यात आले. जर तुमचा चौकशी अहवालात ठाकूर दोषी असल्याचे मान्य केले तर मग ठाकूर याला अजून अटक का केली नाही. सरकारची आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाचा छडा लावायचा असेल तर दोषी आढळलेल्या ठाकूर याच्यावर तातडीने आरोपपत्र दाखल करून त्याला अटक व्हायला हवी. फक्त पदमुक्तच्या नावाखाली संजय ठाकूर याला एका अर्थाने डिग्नीफाइड एक्झिट देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
संजीव ठाकूर याच्यावर सरकार का मेहरबान होत आहे ? संजीव ठाकूर याला वाचवण्यामध्ये कुणाचे हित आहे? संजीव ठाकूरला ताब्यात घेतले आणि त्याने तोंड उघडले तर कुणाचे नाव बाहेर येईल, अशी भीती वाटत आहे? ललित पाटील याला संरक्षण कोणी दिले? असा मुजोर सवाल करणारे गृहमंत्री आता त्याचे उत्तर देतील का? असा टोला संजीव ठाकूर यांनी सुषमा अंधारे यांना लगावला.