पुणे: भाजपने अखेर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने कसबा पोटनिवडणुकीतून टिळक घराण्याला डावललं आहे. त्याऐवजी हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली आहे. हेमंत रासणे हे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय आहेत. टिळक कुटुंबाला डावलण्यात आल्याने शैलेश टिळक यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपमधील हे नाराजी नाट्य सुरू असतानाच एका हिंदुत्ववादी नेत्यानेही कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे कसब्यात भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसून येत आहे.
हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी कसबा पोटनिवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. दवे उद्या सोमवारी कसब्यातून उमेदवारी अर्जही भरणार आहेत. कसबा विधानसभा आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहेत, असं आनंद दवे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे कसब्यातून निवडणूक तिरंगी होणार असल्याचं चित्रं दिसत आहे.
आनंद दवे हे हिंदू महासंघाचे नेते आहेत. हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे कसब्यात हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपने या निवडणुकीत थेट टिळक कुटुंबीयांना डावललं आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसब्याची जागा रिक्त झाली होती.
तर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवडची जागा रिक्त झाली होती. भाजपने चिंचवडमध्ये जगताप यांच्या पत्नीला तिकीट दिलं. पण कसब्यात टिळक कुटुंबीयांना डावललं. त्याऐवजी हेमंत रासणे यांना तिकीट दिलं. त्यामुळे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता दवे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याने या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.
हेमंत रासणे हे दगडू शेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे विश्वस्त आहेत. ते माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सदस्य आहेत. शिवाय खासदार गिरीश बापट यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यामुळेच रासणे यांना उमेदवारी दिली गेल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कसब्याची जागा रासणे राखणार का? अशी चर्चा आता रंगली आहे.
दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत मनसेही उमेदवार देणार असल्याचं सांगितलं जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते कसब्याबाबत उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे यांनी कसब्यातून उमेदवार दिल्यास कसब्यात चौरंगी लढत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.