पुणे: एमआयएमचे (mim) नेते अकबरुद्दी ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्याने त्यावर आता टीका होऊ लागली आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (anand dave)यांनी थेट औरंगजेबाच्या कबरीलाच आक्षेप घेतला आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला? असा सवाल आनंद दवे यांनी केला आहे. आमच्या शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, संभाजी राजांना ठार मारणाऱ्या, छत्रपतींच्या पूर्ण परिवारालाच शत्रू समजणाऱ्या, आमच्या दैवतांवर कुऱ्हाड चालवणाऱ्या राज्याच्या सर्वात मोठ्या शत्रूची कबर इथे हवीच कशासाठी? असा सवाल दवे यांनी केला आहे. दवे यांनी हा सवाल केल्याने त्यावर प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजण्याची चिन्हे दिसत आहे. दरम्यान, दवे यांच्या या विधानावर एमआयएमकडून अजून प्रतिक्रिया आली नाही.
आनंद दवे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या पाया पडणे चांगले का वाईट यावर चर्चाच कशी होऊ शकते? कसाब, अफझलगुरु, यासिन मलिक यांचा औरंगजेब हा पूर्वज होता. त्याला या मातीत स्थान देण्याची गरजच नाही. औरंगजेबाच्या कबरीच्या पाया पडणं हे हिंदूंना डिवचण्यासाठीच आहे हे आम्हाला कळत आहे, असं दवे म्हणाले.
पानिपतच्या शत्रूची कबर एकेकाळी मराठ्यांनी फोडली होती, हे कर्तृत्व महाराष्ट्राने लक्षात ठेवावे. मंदिरात इफ्तार झाडणाऱ्याच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांचे नेते आता गप्प का आहेत?, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारने औरंगजेबाची कबर काढूनच टाकावी, अशी मागणीही त्यांनी केली.
एमआयएमन नेते अकबरुद्दीन ओवैसी काल औरंगाबादेत होते. औरंगाबाद दौऱ्यात त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. तुम्हाला घाबरायाची गरज नाही. जो भी कुत्ता, जैसे भी भोंकता है, उसे भोंकने दो. मी त्यांच्यावर टीका काय करू मी त्यांच्यावर टीका करावी तेवढी त्याची औकात नाही. माझा तर एक खासदार आहे. तर ते तर बेघर आहेत. त्यांना तर घरातून काढून टाकले होते. त्यांच्यावर मी काय बोलू? असा सवाल ओवैसी यांनी केला होता.