पुणे : पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात आहेत. त्याच्यावर हनी ट्रॅप प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुमारे दोन हजार पानांचे हे आरोपपत्र आहे. दहशतवाद विरोधी पथकाने प्रदीप कुलरुकर केसचा संपूर्ण तपास केला. त्याच्याविरोधात भक्कम पुरावे जमा करण्यात आले आहे. तसेच एटीएसने त्याची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी करण्याची मागणी न्यायालयात केली आहे. या सर्व प्रकरणात एटीएसने नवीन खुलासा केला आहे. प्रदीप कुरुलकर याने कोणती माहिती पाकिस्तानला दिली, ते प्रथमच सांगितले आहे.
प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तान हेराला भारताच्या क्षेपणास्त्रांची माहिती दिली. एटीएसने केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रह्मोस, अग्नी या क्षेपणास्त्राची गुपिते प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानला दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिसाईल लाँचर, इमेटॉर रफेल, डीआरडीओचा ड्यूटी चँट अशी माहिती त्याने पाकिस्तानला पुरवली आहे. प्रदीप कुरुलकर याला हनी ट्रॅप प्रकरणात अडकवलेल्या झारा दासगुप्ता हिला सर्व माहिती दिली आहे.
देशाची संवेदनशील माहिती प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानला दिली आहे. डीआरडीओच्या संरक्षण प्रणालीचा भंग कुरुलकर याने केला आहे. शत्रू राष्ट्राला माहिती दिल्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा ठपका दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
अटक केल्यानंतर ‘डीआरडीओ’चे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याचे दहशतवाद विरोधी पथकाने कसून चौकशी केली आहे. या चौकशीत धक्कादायक माहिती मिळाली आहे. तो पाकिस्तानी एजंट झारा दासगुप्ताचा संपर्कात होता. तिच्याशी संवादही केले आहेत. तसेच देशातील गोपनीय माहिती त्याने दिली आहे. प्रदीप कुरुलकर याच्या लॅपटॉप अन् तीन मोबाईल आणि संगणकाची हार्ड डिस्क जप्त केली आहे.
डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर याच्या निवृत्तीस फक्त सहा महिन्यांचा कालावधी राहिला होता. निवृत्त होण्यापूर्वी कुरुलकर हनीट्रॅपमध्ये अडकले. DRDO ची व्हिजिलेंस अन् इंटीलिजेंस टीम त्याच्यावर देखरेख ठेवत होती अन् पुरावे मिळताच त्याला अटक केली गेली.