शिवाजी पार्कवरील मेळाव्याला किती गर्दी होणार, शिवसैनिकांची भावना काय?
उद्धव ठाकरे जो आदेश देतील, तो पाळणार असल्याचं सुबोध भावे यांचे वडील सुरेश भावे म्हणाले.

प्रदीप कापसे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमविण्याचा प्रयत्न दोन्ही शिवसेना गटांकडून केला जात आहे. पुण्यातही शिवसेनेकडून दसरा मेळाव्याला जाण्यासाठी तयारी केली जात आहे. शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितलं की, दसरा मेळावा हा शिवसैनिकांना नवीन नाही. शिवसेनेच्या स्थापनेपासून म्हणजे 1966 पासून दसरा मेळाव्याचा इतिहास आहे. कळायला लागलं तेव्हापासून दरवर्षी शिवतीर्थावर जातोय. घरी सोनं लुटायचं. पण, विचारांचं सोनं लुटायला शिवतीर्थावरच जायचं. शिवसेनाप्रमुखांचं भाषण ऐकल्याशिवाय करमत नाही.
शिवसेना कधीही संपणार नाही
पुणे शहरातल्या आठही विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी यांच्या बैठका झाल्या. तयारी झाली. युवा सेना, युवती सेना, महिला आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा शिवतीर्थावर येणार आहेत. ही चौथी बैठक आहे. प्रभागानुसार बैठका घेत आहोत.
हजारो शिवसैनिक मुंबईला जातील. कुणी रेल्वेनं, कुणी बसनं, कुणी खासगी वाहनानं शिवतीर्थावर जातील. असे कितीतरी बंड आले नि गेले. रसातळाला गेले. पण, शिवसेना कधीचं संपणार नाही.
ठाकरेंचा आदेश पाळणार
उलट प्रचंड गर्दी दिसेल. त्यामुळं सगळ्यांचे धाबे दणाणून जातील, असा विश्वास ज्येष्ठ शिवसैनिकानं व्यक्त केलाय. फुटलेले गद्दार असतील, तरी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील. अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.
मी पण जाणार आहे. महाराष्ट्राच्या बाहेरील शिवसैनिकही येणार आहेत. मेळावा व्यवस्थित पार पडेल. उद्धव ठाकरे जो आदेश देतील, तो पाळणार असल्याचं सुबोध भावे यांचे वडील सुरेश भावे म्हणाले.