Maharashtra Rain : शेतकऱ्यांनी नियोजन करावे, या महिन्यात पाऊस नाहीच, हवामान विभागाचा सल्ला
IMD Weather forecast : राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे. आता पुणे हवामान विभागाकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. हवामान विभागाने शेतकऱ्यांना नियोजनाचा सल्ला दिला आहे.
पुणे | 24 ऑगस्ट 2023 : राज्यात पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस राज्यात आतापर्यंत झाला आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पुणे हवामान विभागाने पावसासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार आता या महिन्यात पाऊस नसणार आहे. सरळ सप्टेंबर महिन्यात पावसाचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नियोजन करावे, अशी सूचना पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी केले आहे.
काय आहे हवामान विभागाचा सल्ला
राज्यात गेल्या ८ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आता ऑगस्ट महिन्याचा फक्त एक आठवडा राहिला आहे. या एका आठवड्यातही राज्यात पाऊस नाही. आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होईल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
का रखडला पाऊस
प्रशांत महासागरात अल निनोचा प्रभाव दिसून येत आहे. यामुळे सध्या राज्यात पाऊस नाही. यापूर्वी भारतात २००४, २००९, २०१४ आणि २०१८ मध्ये अल निनोचा प्रभाव होता. त्या वर्षी देशात दुष्काळ पडला होता. यंदा अल निनोचा प्रभाव असण्याची शक्यता व्यक्त केली होती. यामुळे पावसाचे प्रमाण कमी आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अजून पाऊस काही दिवसांनी होणार आहे. सरळ सप्टेंबर महिन्यात पाऊस पडणार आहे. यामुळे पुढील १० दिवस शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
सुप्रिया सुळे यांची मागणी
महाराष्ट्रात जुन आणि जुलै या महिन्यांत सामाधानकारक पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा ६८ टक्के पाऊस कमी आहे. राज्यातील सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. राज्यातील ही परिस्थिती भीषण आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. तसेच राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत केली आहे. त्यांनी हे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करुन केले आहे.