रणजित जाधव, पुणे | 23 जुलै 2023 : पुणे, मुंबईसह लोणावळा, खंडाळा परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे लोणावळा, खंडाळा, माथेराण या ठिकाणी वीकेंड साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. शनिवार, रविवार असा सलग दोन सुट्या आल्यामुळे पर्यटक वर्षा पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे भुसी धरणावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. या ठिकाणी बंदी असतानाही अनेक पर्यटक येत आहे.
सुट्यांमुळे मुंबई, पुण्यातीलच नव्हे तर राज्यभरातील पर्यटक लोणावळ्यात आले आहेत. यामुळे लोणावळ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. लोणावळा ते भुशी धरणापर्यंत 6 ते 7 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. लोणावळ्यामधून भुशी धरण, टायगर,लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. लोणावळा पोलिसांवर या वाहतूक कोंडीचा ताण पडला आहे. बेशिस्त पर्यटकांमुळे अन्य पर्यटकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लोणावळा येथील लोहगडावर रविवारी २ जुलै रोजी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे शेकडो पर्यटक गडावर अडकून पडले होते. पावसाळा सुरु झाला की अनेक पर्यटक लोहगडावर येतात. त्यामुळे दरवर्षी असा प्रकार होत असतो. यामुळे लोणावळा पोलिसांनी यावर आता पर्यायी मार्ग सुरु केला आहे. कार्ला फाटा ते लोहगड या मार्गाची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर यासंदर्भात नियोजन करण्यात आले. पर्यटकांना लोहागडावरुन परत येताना मळवली- देवले हा मार्ग दिला. त्यामुळे गर्दी कमी होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी लोहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी पर्यायी मार्ग दिला आहे. पर्यटकांना परत येताना मळवली- देवले या मार्गावरुन यावे. यासाठी त्याठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे. तसेच वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांचे लक्ष त्या ठिकाणी आहे. नियम तोडणाऱ्यांना पोलीस ठाण्यात बसवण्यात येत आहे. पर्यटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन लोणावळा पोलिसांनी केले आहे.