Pune Child marriage : लपून केला पण उघड झालाच! पुण्यात अल्पवयीन मुलीचं लग्न लावल्याप्रकरणी पती अटकेत, वडिलांसह सासू-सासरे फरार
पत्नी अल्पवयीन असल्याचे पतीला माहीत असतानाही त्याने तिच्याशी लग्न केले. तसेच लग्नापासून फेब्रुवारी 2022पर्यंत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे संबंधित महिला गर्भवती झाली.
पिंपरी चिंचवड : अल्पवयीन मुलीचा विवाह (Child marriage) केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देण्यात आला होता. याप्रकरणी अल्पवयीन मुलीचे वडील, सासू-सासरे आणि पती यांच्यावर हा गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आहे. आरोपी वडील महादेव डोंगरे, सासू, सासरे सुखदेव खंडागळे, पती राहुल खंडागळे या चौघावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीचे वय 17 वर्ष आणि 5 महिने असतानादेखील 19 जानेवारी 1019रोजी आरोपींनी संगनमत करून तिचे वय 18 पूर्ण नसल्याचे माहिती असताना सुद्धा हा बालविवाह लावून दिला तसेच पती राहुल खंडागळे याला सुद्धा पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण करत तिला गर्भवती (Pregnant) केले.
माहीत असतानाही पतीने प्रस्थापित केले शारीरिक संबंध
अल्पवयीन मुलीचे वडील महादेव मुरलीधर डोंगरे (वय 52, रा. मोरया हौसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड) हे रिक्षाचालक आहेत. सासरे सुखदेव खंडागळे (वय 55) बिगारी काम करतात. तर पती राहुल खंडागळे (वय 28, रा. मोरया हौसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड) हादेखील रिक्षाचालक आहे. पत्नी अल्पवयीन असल्याचे पतीला माहीत असतानाही त्याने तिच्याशी लग्न केले. तसेच लग्नापासून फेब्रुवारी 2022पर्यंत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे संबंधित महिला गर्भवती झाली.
विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. चारही आरोपींवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा व बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी पती राहुल खंडागळेला अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपी सध्या फरार आहेत.
कायदा काय सांगतो?
लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय 18 आणि वराचे 21पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो. पूर्वी काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्याचे आपल्या नात्यात लग्न ठरवून टाकले जात, तशा शपथा जातीच्या पंचांसमोर घेतल्या जात असत. बालविवाह झालेल्या मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत 18 वर्ष गाठायच्या आतच त्यांना गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण याचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहात नाहीत.