‘माझा पोपट दे, नाहीतर घटस्फोट देणार नाही’, पुण्यातलं अजब प्रकरण
पुण्यात सध्या एका घटस्फोटाची जोरदार चर्चा आहे. हे घटस्फोटाचं प्रकरण एका आफ्रिकन पोपटासाठी रखडलं होतं. पतीने आपल्या पत्नीला लग्नापूर्वी एक ऑफ्रिकन पोपट भेट म्हणून दिला होता. याच पोपटावरुन घटस्फोटाचं प्रकरण रखडलं होतं.
योगेश बोरसे, Tv9 मराठी, पुणे | 21 डिसेंबर 2023 : पुण्यात एका घटस्फोटाच्या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरु आहे. पती-पत्नीचं नातं तुटणं यापेक्षा वाईट गोष्ट कोणती असू शकत नाही. पण काही वेळा मतभेदांमधून दुरावा निर्माण होतो. या दुराव्यामुळे हळूहळू नात्यात पोकळी निर्माण होते. ही पोकळी पुढे वाढत जाते आणि अखेर घटस्फोटापर्यंत गोष्टी जातात. त्यामुळे नवरा-बायकोच्या नात्यात दोघांनी सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे. एकमेकांना खूप समजून घेतलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे. पण फक्त ते तसं जगता यायला पाहिजे. कारण प्रेमाने जग जिंकता येतं. त्यामुळे हे प्रेम नात्यात ठेवलं तर आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदेल. अनेक जण तसं आयुष्य जगतातही, पण काही ठिकाणी गोष्टी बिघडत जातात आणि प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत पोहोचतं.
घटस्फोटाच्या घटना घडतात. त्यात फार गैर आहे, असं काही नाही. याउलट आपण नात्यामध्ये अडकून पडलो आहोत, आपलं स्वातंत्र्य हरवलं आहे, किंवा आपले जोडादारासोबत खटके उडत आहेत, मतभेद आहेत, आपली घुसमट होत आहे, असं वाटत असेल तर परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला तर त्यात काहीच गैर नाही. अशा घटना घडत असतात. पण पुण्यात एक थोडसं वेगळं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात महिलेकडून घटस्फोट देण्यासाठी जी अट ठेवण्यात आली होती, त्यावरुन चर्चा सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित प्रकरण पुण्यातलं आहे. या जोडप्याने 11 डिसेंबर 2019 ला पुण्यातील रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. पण लग्नानंतर दोन महिन्यांनी त्यांच्यात मतभेद होण्यास सुरुवात झाली. दोघांमध्ये जोरदार खटके उडायला लागले. अखेर पत्नीने डिसेंबर 2022 मध्ये कौटुंबिक न्यायलायत घटस्फोटाचा अर्ज केला. त्यानंतर हे प्रकरण समुपदेशनासाठी पाठवण्यात आले.
दोघंही एकमेकांसोबत राहण्यास इच्छुक नसल्याने घटस्फोटोचा निर्णय झाला. दोन्ही घटस्फोटोसाठी तयार असल्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन दोघं विभक्त होतील, असं वाटत होतं. पण यावेळी पतीने एक अट ठेवली. लग्नापूर्वी पत्नीला भेट म्हणून दिलेला आफ्रिकन ग्रे पोपट परत करावा, अशी मागणी पतीने केली. पती त्यासाठी अडून बसला. दुसरीकडे पत्नीदेखील पोपट द्यायला तयार नव्हती. अखेर महिलेची समजूत काढल्यानंतर, तिचं समूपदेशन केल्यानंतर ती तयार झाली. या प्रकरणावर चर्चा होऊ लागल्यानंतर, पतीची कायदेशी बाजू हाताळणाऱ्या वकील भाग्यश्री सुभाष गुजर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत सविस्तर प्रकरण सांगितलं.